अमित शहा यांना भाजप अध्यक्षपदाची धुरा सांभाळून तीन वर्षे झाली आहेत. विशेष म्हणजे या खास क्षणी गुजरातमधील आमदारांनी राज्यसभेत पाठवून त्यांना विशेष भेट दिली आहे. वर्ष २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत उत्तर प्रदेशचे प्रभारी म्हणून काम करताना राष्ट्रीय लोकशाही आघाडीला (एनडीए) ७३ जागी विजय मिळवून देणाऱ्या अमित शहा यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभा निवडणुकीतील विजयासाठी ‘सामनावीरा’चा पुरस्कार घोषित केला होता. त्यानंतर अमित शहा यांना भाजपचे राष्ट्रीय अध्यक्षपद देण्यात आले. पक्षाध्यक्षपदी काम करताना अमित शहा यांनी पक्षाला एका नव्या उंचीवर नेऊन ठेवले. त्यांच्या अध्यक्षीय कारकीर्दीवर टाकूयात एक नजर..

* अमित शहा यांनी अध्यक्षपद सांभाळताच झारखंड, हरियाणा, महाराष्ट्रात भाजप आणि मित्रपक्षांना विजय मिळाला व त्यांनी सरकारे बनवली.

* गोवा, मणिपूर आणि अरूणाचल प्रदेशसारख्या राज्यांत बहुमत नसतानाही राजकीय गणित साधत सत्ता प्राप्त केली.

* पूर्वोत्तरमध्ये पहिल्यांदाच आसामध्ये भाजपचे सरकार सत्तेवर आले. सर्वानंद सोनोवाल यांच्या नेतृतवाखालील भाजपने तिथे बहुमतातील सरकार बनवले.

* जम्मू काश्मीरमध्ये विचारधारेच्याव विरूद्ध असलेल्या पीडीपीबरोबर युती करून पहिल्यांदाच सत्ता मिळवली.

* बिहारमध्ये महाआघाडीकडून मिळालेल्या पराभवाचे विजयात रूपांतर करून दाखवले. नितीश कुमार यांना आपल्या जाळ्यात ओढत सरकार स्थापन केले.

* यादरम्यान भाजपने ११ कोटी सदस्य बनवले. सध्या भाजप जगातील सर्वांत मोठा पक्ष ठरला आहे.

* अमित शहा यांनी उत्तर प्रदेश आणि उत्तराखंड विधानसभा निवडणुकीत भाजपला प्रचंड बहुामत मिळवून दिले. त्यामुळे देशातील नागरिकांनाही भाजपप्रती विश्वास निर्माण झाला आहे.