राज्यात शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांच्या सत्तास्थापनेसाठी वाटाघाटी होत असताना या संपूर्ण नाटय़ाकडे दिल्लीतील भाजप नेत्यांनी बघ्याची भूमिका घेतली होती. विशेषत: भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी महाराष्ट्राबाबतीत कोणतीही राजकीय हालचाल न करता मौन बाळगणेच पसंत केले. राज्यात राष्ट्रपती राजवट लागू झाल्यामुळे पक्षनेतृत्वाच्या स्तरावर जाणीवपूर्वकच ‘शांतता’ पाळली गेल्याचे स्पष्ट झाले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

शिवसेनेचा पाठिंबा न मिळाल्याने सरकार बनवण्यासाठी पुरसे संख्याबळ नसल्याचे कारण देत भाजपने सत्ता स्थापन करण्यास असमर्थता दर्शवली. त्यानंतर राज्यपालांनी शिवसेनेला सत्ता स्थापन करण्याचे आमंत्रण दिले होते. पण, बिगर भाजप सरकार बनवण्याच्या घडामोडी होत असताना भाजपच्या पक्षनेतृत्वाकडून वा राज्याशी संबंधित नेत्यांनीही महाराष्ट्रातील सत्ताकारणावर कोणतेही विधान करण्याचे टाळले.

शहा यांनी महाराष्ट्राच्या सत्ताकारणात कोणतीही दखल दिली नाही वा त्यावर जाहीर मतही व्यक्त केले नाही, या प्रश्नावर भाजपचे प्रवक्ते नलिन कोहली यांनी प्रतिक्रिया देणे टाळले. शहा यांची भूमिका काय होती वा त्यांनी का प्रतिक्रिया दिली नाही यावर प्रवक्ता या नात्याने मत व्यक्त करणे योग्य नाही, असे कोहली म्हणाले. राज्यात विरोधकांच्या राजकीय हालचाली होत असताना शहा यांचे ‘शांत राहणे’ आश्चर्यकारक मानले जात आहे. याच अमित शहा यांनी हरयाणात भाजपची सत्ता रमखण्यासाठी जंगजंग पछाडले होते. भाजपवर टीका करण्याऱ्या दुष्यंत चौताला यांच्या जननायक जनता पक्षाशी आघाडी करण्याचा आणि दुष्यंत यांना उपमुख्यमंत्री पद देण्याचा निर्णय  शहा यांनी तातडीने घेतला होता. महाराष्ट्रात मात्र सत्ता स्थापण्यासाठी शिवसेनेची मनधरणी करण्यासाठी शहांनी एकदाही मुंबईचा दौरा केला नाही.

नेत्यांचा प्रतिक्रियेस नकार

भाजपच्या या शांतता धोरणावर प्रदेश निवडणूक प्रभारी आणि शहा यांचे विश्वासू भूपेंद्र यादव वा संघटना प्रभारी सरोज पांडे यांनीही प्रसारमाध्यमांकडे मत व्यक्त करण्यास वेळोवेळी नकार दिला.  महाराष्ट्रात विरोधी पक्षांच्या सरकार स्थापनेच्या प्रयत्नांवर वक्तव्य न करण्याचा आदेश भाजप नेतृत्वाने दिला होता. शिवसेना आणि दोन्ही काँग्रेसचे प्रयत्न फोल ठरले की, राष्ट्रपती राजवट लागू करण्याचा पर्याय खुला असल्याची चर्चा भाजपच्या वर्तुळात केली जात होती. शिवसेनेला काँग्रेस खरोखरच पाठिंबा देईल का, अशीही विचारणा केली जात होती.

महाराष्ट्रात प्रचंड वेगाने घडामोडी घडत असताना दिल्लीतून त्यावर कोणतेही भाष्य करणे शक्य नसते आणि तसे करणेही योग्य नसते. वेळोवेळी राज्यातील भाजप नेत्यांनी मतप्रदर्शन केलेले आहे. त्यामुळे दिल्लीतील वरिष्ठ नेत्यांनी भूमिका मांडण्याची गरज नव्हती.

– नलिन कोहली, भाजप प्रवक्ते

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Amit shah conscious silence in maharashtra assembly election power play abn
First published on: 13-11-2019 at 00:51 IST