कर्नाटक विधानसभेत भाजपा भलेही बहुमतापासून दूर आहे. पण पक्षाने जे यश मिळवले आहे ते वाखाणण्याजोगे आहे. भाजपा आमदारांची संख्या १०४ वर येऊन थांबली. राज्यातील नेते आणि कार्यकर्त्यांच्या अखंड परिश्रमामुळे पक्षाला ही कामगिरी करता आली. परंतु, पक्षाध्यक्ष अमित शाह यांनी केलेल्या अत्यंत नियोजनबद्ध आणि अविरत प्रयत्नामुळे पक्षाला हे यश पाहता आले. कर्नाटकात सर्वांत मोठा पक्ष ठरल्यानंतर दिल्लीत पक्ष कार्यकर्त्यांसमोर बोलताना खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमित शाह यांच्या कठीण परिश्रम आणि समर्पण वृत्तीमुळे हे शक्य झाल्याचे सांगितले.

अमित शाहंनी कर्नाटकात ३४ दिवसाच्या आपल्या मुक्कामात २८ जिल्ह्यातून ५७,१३५ किमी प्रवास केला. पक्षातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शाह यांनी निवडणुकीसाठी फार पूर्वीच आराखडा तयार करून ठेवला होता. त्यांनी एकूण ५९ सभा आणि २५ रोड शो केले.

शाह यांनी प्रत्येक मतदारसंघात पक्षाचा एक नेता नेमून त्याच्याकडून वेगवेगळ्या पातळ्यावरून काम करून घेतले. या नेत्याकडून त्यांनी मतदारांची विस्तृत माहिती घेतली. तसेच मोदी सरकारच्या कल्याणकारी योजना त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी दिली. त्यांनी बुथ पातळी आणि जिल्हा पातळीवर ‘जाहीरनामा अधिवेशन’ आयोजित करून तो कार्यकर्त्यांना समजावून सांगितला.

लिंगायत समाजाच्या पाठिंब्यासाठी त्यांनी विविध मठांना भेटी दिल्या. पक्षाच्या स्थानिक नेत्यांकडून मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि त्यांच्या मंत्रिमंडळावर टीका होत नव्हती. त्यावेळी शाह यांनी थेट सिद्धरामय्यांवरच हल्लाबोल केला. विशेष म्हणजे शाह हे मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार बीएस येडियुरप्पा यांच्यावर विसंबून राहिले नाही. त्यांनी एप्रिल महिन्यातच राज्यातील पक्षाच्या प्रचाराची धुरा आपल्या हाती घेतली.