भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांच्याविरोधातील प्रक्षोभक भाषण प्रकरणामध्ये त्यांना क्लीन चीट देण्यात आली आहे. यामुळे अमित शहा यांना मोठा दिलासा मिळाला आहे. या प्रकरणामध्ये अमित शहा यांच्याविरुद्ध कोणतेही पुरावे नाहीत. त्यामुळे त्यांना क्लीन चीट देण्यात येत असल्याचा अहवाल उत्तर प्रदेश पोलिसांनी मंगळवारीच मुझफ्फरनगरमधील न्यायालयात दाखल केला.
लोकसभा निवडणुकीवेळी प्रचारादरम्यान उत्तर प्रदेशात आक्षेपार्ह भाषण केल्याप्रकरणी भाजप अध्यक्ष अमित शहा यांच्या विरोधात गुन्हा नोंदविण्यात आला होता. आदर्श आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी निवडणूक आयोगाच्या निर्देशावरून पोलिसांनी शहा यांच्या विरोधात गुन्हा नोंदवला होता. ४ एप्रिल २०१४ रोजी प्रचारादरम्यान शहा यांनी प्रक्षोभक वक्तव्य केल्याचा आरोप होता. मुझफ्फरनगर दंगलीतून आता २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत अपमानाचा बदला घेण्याची संधी आहे, असे वक्तव्य केल्याचा शहा यांच्यावर आरोप होता. निवडणूक आयोगाने ‘बदला’ या शब्दाला आक्षेप घेत हे प्रथमदर्शनी आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन असल्याचे स्पष्ट केले होते. शहा यांनी मात्र आपण आचारसंहितेचा भंग केला नसल्याचा दावा केला होता