नोटाबंदीच्या वर्षपूर्तीनिमित्त मोदी सरकारकडून ‘काळा पैसाविरोधी दिवस’ साजरा केला जात असताना काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधींनी Rahul Gandhi सरकारवर तोफ डागली. राहुल गांधींनी शायरीच्या माध्यमातून मोदी सरकारवर शरसंधान साधले. राहुल गांधींनी शायरीसोबतच एका वयोवृद्ध व्यक्तीचा बँकेच्या समोरील रांगेतील फोटोही ट्विट केला होता. यावरुनच अमित शहांनी राहुल गांधींना जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.

राहुल गांधी यांनी नोटाबंदीनंतर बँकेसमोरील रांगेत उभे राहून अश्रू ढाळणाऱ्या एका व्यक्तीचा फोटो ट्विट केला होता. ‘एक आँसू भी हुकूमत के लिए खतरा है, तुमने देखा नहीं आँखों का समुंदर होना’, असे त्यांनी ट्विटमध्ये म्हटले होते. मात्र राहुल गांधी यांनी ज्या व्यक्तीचा फोटो ट्विट केला, ती व्यक्ती नोटाबंदीचे समर्थन करत असल्याची माहिती पुढे आली. त्यामुळे आता भाजपने राहुल गांधींवर जोरदार टीका केली आहे. खोटारडेपणा यापुढे चालणार नाही, अशा शब्दांमध्ये भाजप अध्यक्ष अमित शहांनी राहुल गांधींच्या ट्विटला उत्तर दिले.

‘कायम गरिबांचे खोटे फोटो वापरुन सत्ता हस्तगत करत राहिलात. खोटे अश्रू, खोटे फोटो दाखवून लोकांची फसवणूक करणे आता शक्य नाही. काँग्रेसचा खरा चेहरा आता जनतेसमोर आला आहे. नव्या भारताची सुरुवात झाली आहे,’ अशा शब्दांमध्ये अमित शहांनी राहुल गांधींना प्रत्युत्तर दिले. या ट्विटमध्ये अमित शहांनी राहुल गांधी यांना टॅगदेखील केले आहे. अमित शहांसोबतच भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते संबित पात्रा यांनीही राहुल गांधींवर तोंडसुख घेतले. राहुल गांधींनी खोटे ट्विट केल्याचा आरोप पात्रा यांनी केला आहे. ‘राहुल गांधींनी ज्या व्यक्तीला नोटाबंदीने त्रस्त असल्याचे म्हटले आहे. ती व्यक्ती प्रत्यक्षात नोटाबंदीमुळे आनंदी आहे,’ असे पात्रा यांनी म्हटले आहे.

कोण आहे राहुल गांधींनी ट्विट केलेल्या फोटोतील व्यक्ती?
नोटाबंदीच्या निर्णयावरुन केंद्र सरकारवर टीका करताना राहुल गांधींनी ज्या वयोवृद्ध व्यक्तीचा फोटो वापरला, त्या व्यक्तीशी प्रसारमाध्यमांच्या काही प्रतिनिधींनी संवाद साधला. त्यावेळी नोटाबंदीच्या निर्णयावर समाधानी असल्याची प्रतिक्रिया त्या वृद्ध व्यक्तीने दिली. या व्यक्तीचे नाव नंदलाल असून, ते लष्करातून निवृत्त झाले आहेत. नंदलाल गुरुग्राममध्ये एका भाड्याच्या घरात राहतात. ‘सरकारने घेतलेले निर्णय देशाच्या भल्यासाठीच असतात. त्यामुळेच माझा सरकारच्या प्रत्येक निर्णयाला पाठिंबा आहे,’ असे नंदलाल यांनी म्हटले.