खासगी रुग्णालयात दाखल; प्रकृती ठीक असल्याचे ट्वीट

नवी दिल्ली : गेल्या सुमारे साडेचार महिन्यांपासून देशाच्या करोनाविरोधातील लढय़ाची सूत्रे  हलविणारे केंद्रीय गृहमंत्रालयाचे प्रमुख अमित शहा यांना संसर्ग झाला आहे. त्यांना रविवारी गुरुग्राममधील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. संसर्ग झाल्याची माहिती शहा यांनी ट्वीट करून दिली.

‘‘करोनाची सौम्य लक्षणे जाणवू लागल्यामुळे मी चाचणी करून घेतली. त्यातून मी करोनाबाधित झाल्याचे स्पष्ट झाले आहे. माझी प्रकृती ठीक आहे, पण डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार मी रुग्णालयात दाखल होत आहे. गेल्या काही दिवसांमध्ये माझ्या संपर्कात आलेल्या लोकांनी विलगीकरणात जावे आणि चाचणी करून घ्यावी,’’ असे ट्वीट शहा यांनी केले.

५५ वर्षीय शहा यांना ताप किवा करोनाची अन्य लक्षणे नसली तरी त्यांना कालपासून थकवा जाणवू लागला होता. त्यानंतर त्यांनी रविवारी सकाळी चाचणी केली. शहा यांना मधुमेह असल्याने त्यांनी डॉक्टरांच्या देखरेखीखाली राहणे आवश्यक असल्याने त्यांना रुग्णालयात दाखल व्हावे लागले आहे.

भारतीय सांस्कृतिक संबंध परिषदेने लोकमान्य टिळकांच्या स्मृतिशताब्दीनिमित्त आयोजित केलेल्या ‘वेबिनार’मध्ये शहा सहभागी झाले होते. या कार्यक्रमाला खासदार आणि परिषदेचे प्रमुख विनय सहस्रबुद्धे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बुधवारी झालेल्या बठकीला शहा उपस्थित होते. या बठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह, निर्मला सीतारामन, नितीन गडकरी आदी वरिष्ठ मंत्रीही उपस्थित होते. याच बठकीत नव्या शैक्षणिक धोरणाला मान्यता देण्यात आली होती. पंतप्रधानांच्या निवासस्थानी केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बठका होत आहेत. या बठकांमध्ये योग्य अंतर राखूनच मंत्र्यांच्या बसण्याची व्यवस्था केली जाते. शिवाय, पंतप्रधान मोदी मुखपट्टी वापरतात.

राष्ट्रीय आपत्ती नियंत्रण कायद्याअंतर्गत करोनासंदर्भातील सर्व महत्त्वाचे निर्णय घेण्याची जबाबदारी केंद्रीय गृह मंत्रालयाकडे आहे. गृहमंत्री या नात्याने शहा सातत्याने बठका घेत आहेत. त्यामुळे गृह मंत्रालयातील वरिष्ठ अधिकारी वर्गही त्यांच्या संपर्कात आलेला आहे. त्यांनाही चाचणी करावी लागणार असून विलगीकरणात जावे लागणार आहे.

दिल्लीमध्ये करोनाचा उद्रेक झाल्यानंतर शहा यांनी दिल्लीच्या प्रशासकीय अधिकाऱ्यांची नियमित बठक घेतली होती. लोकनायक रुग्णालय तसेच, नव्या करोना आरोग्यसेवा केंद्रांनाही शहा यांनी भेट दिली होती. शुक्रवारी शहा यांनी पश्चिम बंगालमधील भाजप नेत्यांची भेट घेतली होती.

अयोध्येतील भूमिपूजनावर सावट?

’अयोध्येत राममंदिरच्या भूमिपूजनाचा सोहळा होणार असून त्यावरही करोनाचे सावट आहे. या समारंभाला केंद्रीय गृहमंत्री अमित शहा उपस्थित राहणार नव्हते.

’पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम होणार आहे. शिवाय, २०० निमंत्रित मान्यवरही उपस्थित असतील.

’अयोध्येतील पुजारी करोनाबाधित झाले असून भाजपचे उत्तर प्रदेश प्रदेशाध्यक्ष स्वतंत्र देव सिंह यांनाही करोनाचा संसर्ग झाला आहे. ते घरात विलगीकरणात आहेत.

अमिताभ करोनामुक्त

मुंबई : करोनाचा संसर्ग झाल्याने ११ जुलैपासून मुंबईतील नानावटी रुग्णालयात दाखल असलेले ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन करोनामुक्त झाल्याने त्यांना रविवारी घरी सोडण्यात आले. ते काही दिवस गृहविलगीकरणात राहणार आहेत. अमिताभ आणि त्यांचे पुत्र अभिषेक यांना एकाच वेळी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. अभिषेक बच्चन यांना अद्याप संसर्ग असल्याने आणखी काही दिवस उपचार घ्यावे लागणार आहेत.

सहस्रबुद्धे गृह विलगीकरणात : लोकमान्य टिळक स्मृतिशताब्दीनिमित्त दिल्लीत झालेल्या कार्यक्रमात शनिवारी भाजपचे राष्ट्रीय उपाध्यक्ष विनय सहस्रबुद्धे आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा एका व्यासपीठावर होते. त्यामुळे सहस्रबुद्धे यांनी स्वत: हून गृह विलगीकरणात राहण्याचा निर्णय घेतला आहे.

उत्तर प्रदेशच्या मंत्री कमलराणी यांचा मृत्यू

लखनऊ : उत्तर प्रदेशच्या तंत्रशिक्षणमंत्री कमलराणी वरुण यांचा रविवारी करोनाने मृत्यू झाला. त्या ६२ वर्षांच्या होत्या. संजय गांधी पदव्युत्तर वैद्यकीय विज्ञान संस्थेत त्यांच्यावर उपचार सुरू होते. कमलराणी यांना करोना संसर्ग झाल्याचे १८ जुलैला स्पष्ट झाले होते. त्या कानपूरमधील घाटमपूरच्या आमदार होत्या.

तमिळनाडूच्या राज्यपालांना संसर्ग :  तमिळनाडूचे राज्यपाल बनवारीलाल पुरोहित यांना करोनाचा संसर्ग झाला आहे. सौम्य लक्षणे असल्याने त्यांना निवासस्थानीच विलगीकरणात राहण्यास सांगण्यात आले.

येडीयुरप्पा बाधित : कर्नाटकचे मुख्यमंत्री बी. एस. येडीयुरप्पा यांना करोना संसर्ग झाला आहे. त्यांनीच ट्वीटवरून ही माहिती देत संपर्कात आलेल्यांना विलगीकरणात जाण्याचे आवाहन केले.