प्रदेश अध्यक्षाची निवड १५ जानेवारीपूर्वी करण्याची सूचना
दिल्ली व बिहार विधानसभा निवडणुकीतील दारुण पराभवामुळे पक्ष व संघ परिवारातून नाराजीचा सूर उमटत असताना भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी दुसऱ्यांदा पक्षाध्यक्षपदाची तयारी सुरू केली आहे. केंद्रीय गृह मंत्री राजनाथ सिंह यांच्या जागी नियुक्ती झाल्याने शहा यांची अध्यक्षपदाची खरी कारकीर्द २३ जानेवारीनंतर सुरू होणार आहे. केंद्रात सत्तास्थापनेनंतर सिंह यांच्याजागी अमित शहा यांची नियुक्ती झाली होती. दुसऱ्यांदा अध्यक्ष होण्यापूर्वी शहा यांनी स्वतच्या विश्वासू नेत्यांना विविध राज्यांमध्ये प्रदेश अध्यक्ष निवडीची प्रक्रिया पार पाडण्याची जबाबदारी सोपवली आहे. सर्व राज्यांमध्ये प्रदेश अध्यक्ष निवडीची प्रक्रिया १५ जानेवारीपूर्वी आटोपण्यासाठी शहा यांनी तगादा लावला आहे.
राज्यातील गट-तट सांभाळण्यासाठी शहा यांनी पक्ष निरीक्षक, पर्यवेक्षकांना सूचना देऊन राज्यात पाठविले आहे. छत्तीसगड प्रदेश अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी ऐनवेळी खा. गणेश सिंह यांना हटवून शहा यांनी राजस्थानचे भुपेंदर यादव यांची नियुक्ती केली. रविवारी ही निवडणूक पार पडली. त्यापूर्वी शुक्रवारी रात्रीच यादव यांना शहा यांनी भेटीसाठी बोलावून घेतले. त्यांना सूचना देऊन राज्यातील विविध गटाच्या नेत्यांशी चर्चा करण्याची सूचना केली. सर्व गट-तटाच्या नेत्यांशी बोलून जो प्रदेश अध्यक्ष होईल त्याचे नेतृत्व मान्य करण्यासाठी राज्यातील नेत्यांना ‘शिस्तीचा धडा’ देण्याची सूचनाही शहा यांनी केली होती. महाराष्ट्रातील निवड प्रक्रिया १५ जानेवारीपर्यंत पूर्ण करण्यासाठी केंद्रीय संघटनमंत्री रामलाल यांनी तगादा लावला आहे. शहा दुसऱ्यांदा अध्यक्ष होणार हे निश्चित असले, तरी सर्व राज्यांमधील गट-तटांना शांत करण्याचे काम शहा सध्या करीत आहेत. आतापर्यंत केरळ, पश्चिम बंगाल, मध्य प्रदेश, छत्तीसगड, आसाम व झारखंड या प्रमुख राज्यांमध्ये अध्यक्ष निवडण्यात आले आहेत. दिल्ली, महाराष्ट्र, उत्तर प्रदेश या राज्यांची निवड प्रक्रिया अद्याप संपलेली नाही.