सुधारित नागरिकत्व कायद्याला पाठिंबा मिळावा म्हणून भाजपाने सुरु केलेल्या टोल फ्री क्रमांकाच्या मोहिमेवरुन भाजपाची चांगली खिल्ली उडवली जात आहे. आता यामध्ये दिग्दर्शक अनुराग कश्यपही सहभागी झाला आहे. अनुरागने थेट केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना एका अश्लील ट्विटवरुन ‘हा तुमचा जोडधंदा आहे का?’ असा सवाल विचारला आहे.

काय आहे प्रकरण…

केंद्रातील भाजपा सरकारने आणलेल्या सुधारित नागरिकत्व कायद्याला (सीएए) देशभरातून विरोध होताना दिसत आहे. मागील काही दिवसांपासून देशातील वेगवेगळ्या ठिकाणी सीएएला पाठिंबा देणारे आणि विरोध करणारे मोर्चे निघाल्याचं पहायला मिळालं. याच पार्श्वभूमीवर या कायद्याला भारतीयांचा पाठिंबा मिळावा म्हणून भाजपाने टोल फ्री क्रमांकावर फोन करुन तुमचा पाठिंबा नोंदवा ही मोहिम सुरु केली होती. मात्र या क्रमांकावरुन अनेकांनी भाजपाची खिल्ली उडवली आहे. विरोधीपक्षांबरोबरच नेटकऱ्यांनाही या मोहिमेवरुन भाजपावर टीका केली आहे. अनेक वेगवेगळ्या कारणांसाठी हा क्रमांक व्हायरल केला. काहींनी हा ऑफर मिळवण्यासाठी तर काहींनी नेटफ्लिक्सशी संबंधित असल्याचे ट्विट केले. काहींनी तर चक्क हा क्रमांक फ्रेण्डशीप क्लब वगैरेचा क्रमांक असल्याचे ट्विट करत भाजपाची खिल्ली उडवली.

काय म्हणाला अनुराग…

भाजपाचे अध्यक्ष अमित शाह यांनी ट्विटवरुन ८८६६२८८६६२ या टोल फ्री क्रमांकांवर मिस कॉल देऊन तुमचा पाठिंबा द्या असं आवाहन करणारं ट्विट केलं होतं. मात्र हा क्रमांक वापरुन एकाने मोफत सेक्ससाठी शहरामध्ये ६९ जण उपलब्ध आहेत अधिक माहितीसाठी या क्रमांकावर फोन करा असं म्हणत ट्विट केला होता. या दोन्ही ट्विटचे स्क्रीनशॉर्ट शेअर करत अनुरागने शाह, भाजपा आयटी सेलचे प्रमुख अमित मालवीय आणि भाजपावर निशाणा साधला. “काय अमित शाहजी एकच क्रमांक दोघांकडे आहे. हा तुमचा जोडधंदा आहे का. की नेहमीप्रमाणे अमित मालवीय आणि भाजपा लोकांना मुर्ख बनवत आहे,” असं अनुरागने हे दोन्ही स्क्रीनशॉर्ट शेअर करत म्हटलं आहे.

शाह यांचे स्पष्टीकरण

या क्रमांकावरुन अनेकांनी भाजपाची खिल्ली उडवली आहे. विरोधीपक्षांबरोबरच नेटकऱ्यांनाही या मोहिमेवरुन भाजपावर टीका केली आहे. हा क्रमांक नेटफिक्सचा असल्याची चर्चाही सोशल नेटवर्किंगवर चांगलीच रंगली. या क्रमांकाच्या विश्वासार्हतेवरुन सुरु असलेल्या या गोंधळाच्या पार्श्वभूमीवर शाह यांनी दिल्लीतील इंदिरा गांधी स्टेडियममध्ये यासंदर्भात स्पष्टीकरण द्यावे लागले आहे. दिल्लीतील इंदिरा गांधी स्टेडियममधील कार्यकर्ता मेळाव्यामध्ये सोमवारी अमित शाह यांनी आपल्या भाषणामध्ये सुधारित नागरिकत्व कायद्याशी संबंधित भाजपाने जारी केलेल्या क्रमांकाचा नेटफिक्सशी संबंध नसल्याचे म्हटलं आहे.