अमित शहा यांना विश्वास

शिवसेनेकडून सातत्याने विरोधी भूमिका घेतली जात असल्याने विधानसभेची मध्यावधी निवडणूक घेण्याचा मतप्रवाह भाजपमध्ये असला तरी महाराष्ट्रात मध्यावधी निवडणुकांची शक्यता वाटत नाही, परंतु तसे झालेच तर भाजपला चांगले यश मिळेल, असा विश्वास व्यक्त करत भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांनी शिवसेनेला सूचक इशारा दिला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सरकारला तीन वर्षे पूर्ण झाल्याबद्दल प्रादेशिक वृत्तपत्रांच्या प्रतिनिधींशी संवाद साधताना शहा यांनी महाराष्ट्रातील राजकीय परिस्थितीविषयी मार्मिक प्रतिपादन केले. एकीकडे मध्यावधी निवडणुकांची आवश्यकता नाही हे सांगतानाच दुसरीकडे मध्यावधी झाल्यास भाजपच जिंकेल, अशा विश्वास व्यक्त करून शहा यांनी राजकीय संभ्रम निर्माण केला. माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी दोनच दिवसांपूर्वी राज्यात मध्यावधी निवडणुका होतील, असे भाकित वर्तविले होते. त्यावर एखादा नेता असा निर्णय घेत नसतो, असे सांगत शहा यांनी खडसे यांना टोला लगावला. शिवसेनेच्या वाढत्या विरोधाकडे अमित शहा यांचे लक्ष वेधले असता त्यांनी, शिवसेना हा पक्ष केंद्र आणि राज्याच्या सत्तेत भागीदार असल्याने शिवसेना नेत्यांनीच आता निर्णय घ्यावा, असे मत व्यक्त केले.

शिवसेनेचे मंत्री सरकारमध्ये सहभागी आहेत. सरकारच्या निर्णयात त्यांचाही सहभाग असतो. मग विरोध कशाला करतात, असा सवालही त्यांनी केला. प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांचा बोलण्याचा  ढंगच वेगळा आहे. त्यातून ते खुलेपणाने मते मांडतात, असे सांगत शहा यांनी रावसाहेब दानवे यांचे समर्थन केले.

राणे भेटले नाहीत

काँग्रेसचे नेते नारायण राणे यांनी अहमदाबादमध्ये आपली भेट घेतली नाही, असे अमित शहा यांनी स्पष्ट केले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राणे या दोघांची अहमदाबाद विमानतळावर भेट झाली. तेथून शासकीय अतिथिगृहापर्यंत फडवणीस यांनी त्यांच्या वाहनातून राणे यांना नेले. पुढे फडणवीस हे एकटेच आपल्या निवासस्थानी आले होते. फडणवीस यांच्याबरोबर राणे आपल्या भेटीला आलेच नव्हते, असे शहा यांनी सांगितले. राणे भाजपच्या संपर्कात आहेत का, या प्रश्नावर ‘देशातील अनेक नेते भाजपमध्ये येण्यास उत्सुक आहेत’, असे सांगत राणे यांच्याबाबत अधिक  काही बोलण्याचे शहा यांनी टाळले.