20 October 2019

News Flash

अमित शाह यांनी नाकारली एलिट कमांडो फोर्स NSG ची सुरक्षा

भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी देशातील एलिट कमांडो फोर्स NSG ची सुरक्षा नाकारली.

भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी राष्ट्रीय सुरक्षा गार्ड म्हणजे एनएसजीची सुरक्षा नाकारत केंद्रीय राखीव पोलीस दलाची सुरक्षा कायम ठेवली आहे. अमित शाह यांची केंद्रीय गृहमंत्रीपदी नियुक्ती झाल्यानंतर त्यांना एनएसजीची सुरक्षा मिळणार होती. पण शाह यांनी हे सुरक्षा कवच नाकारले व सीआरपीएफची सुरक्षा कायम ठेवली.

केंद्रीय गृहमंत्रालयाच्या समितीच्या रिपोर्टनुसार पंतप्रधान नरेंद्र मोदींनंतर अमित शाह यांना सर्वाधिक धोका आहे. इंटेलिजन्स ब्युरोकडून मिळणाऱ्या माहितीच्या आधारावर गृहमंत्रालयाची समिती समीक्षा करत असते. अमित शाह यांच्याआधीचे गृहमंत्री राजनाथ सिंह, पी. चिदंबरम, सुशील कुमार शिंदे आणि शिवराज सिंह यांना एनएसजीचे सुरक्षा कवच होते.

गृहमंत्रीपदी नियुक्ती झाल्यानंतर अमित शाह यांच्या जीवाला असणारा धोका लक्षात घेता त्यांना एनएसजी सुरक्षा स्वीकारण्याची विनंती करण्यात आली होती. पण शाह यांनी त्याला नकार दिला व सीआरपीएफची सुरक्षा कायम ठेवण्यास सांगितले. शाह यांच्या सुरक्षेसाठी निमलष्करी दलाचे १०० कमांडो तैनात असतात. जे कार्यालयापासून निवासस्थान आणि प्रवासामध्ये शाह यांची सुरक्षा करतात. शाह यांच्या निवासस्थानाबाहेर सुरक्षेसाठी दिल्ली पोलिसही तैनात असतात. ६ ए कृष्णा मेनन मार्गावर अमित शाह यांचे निवासस्थान आहे. तिथे दिल्ली पोलिसांचे ५० जवान तैनात असतात.

एनएसजी म्हणजे काय
एनएसजी ही देशातील एलिट कमांडो फोर्स आहे. खास दहशतवाद्यांविरुद्ध ऑपरेशन्ससाठी एनएसजीची स्थापना करण्यात आली. एनएसजी केंद्रीय गृहमंत्रालयाच्या अखत्यारित काम करते. १९८४ सालच्या ऑपरेशन ब्ल्यू स्टार आणि दिवंगत पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या हत्येनंतर एनएसजीची स्थापना करण्यात आली. एनएसजीकडे व्हीआयपी सुरक्षेचीही जबाबदारी आहे. एनएसजी जवानांचा जो युनिफॉर्म आहे त्यामुळे मीडियामध्ये त्यांना ब्लॅक कॅट कमांडो म्हणून ओळखले जाते.

मुंबईवर झालेल्या २६/११ दहशतवादी हल्ल्यानंतर एनएसजी कमांडोंना पाचारण करण्यात आले होते. हरयाणा मानसेरहून आलेल्या या कमांडोंनी ताज, ओबेरॉय ट्रायडंट आणि छाबड हाऊसमध्ये घुसलेल्या पाकिस्तानी दहशतवाद्यांचा खात्मा केला होता.

First Published on September 17, 2019 12:24 pm

Web Title: amit shah refuses nsg cover continue with crpf dmp 82