पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्यावर टीका केल्यानंतर आक्रमक झालेल्या काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांना भाजप अध्यक्ष अमित शहा यांनी प्रत्युत्तर दिले आहे. ‘मनमोहन सिंग यांच्यावरील टिकेमुळे व्यथित झालेल्या राहुल गांधी यांनी त्यांच्या आई सोनिया गांधींनी नरेंद्र मोदी यांच्यासाठी कोणती भाषा वापरली होती, हे आठवून पाहावे. सोनिया गांधी यांनी २००७ मध्ये गुजरात विधानसभा निवडणुकीत नरेंद्र मोदी यांना मौत का सौदागर म्हटले होते,’ असे म्हणत अमित शहांनी राहुल गांधींना लक्ष्य केले.

माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्यावर पंतप्रधान मोदी यांनी बुधवारी राज्यसभेत बोलताना जोरदार टीका केली होती. यानंतर राज्यसभेतील काँग्रेस खासदार राज्यसभेतून बाहेर पडले. मनमोहन सिंग यांच्यावर मोदींनी केलेल्या टिकेनंतर काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी पंतप्रधानांवर कठोर शब्दांमध्ये टीका केली. राहुल गांधी यांच्या टिकेला उत्तराखंडमधील सभेत बोलताना अमित शहा यांनी प्रत्युत्तर दिले. यावेळी अमित शहा यांनी राहुल गांधी यांना सोनिया गांधी यांच्या जुन्या विधानाची आठवण करुन दिली.

‘सोनिया गांधींनी २००७ मध्ये नरेंद्र मोदींचा उल्लेख मौत का सौदागर म्हणून केला होता,’ याची आठवण अमित शहांनी राहुल गांधींना करुन दिली. पंतप्रधान मोदींचे जोरदार समर्थन करत अमित शहा यांनी राहुल गांधींसह काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल केला. ‘मनमोहन सिंग यांच्यावर टीका करणाऱ्या पंतप्रधान मोदींवर बोलण्याचा राहुल गांधी यांना हक्क नाही. राहुल गांधी यांनी काँग्रेसची सत्ता असताना मनमोहन सिंग यांच्या मंत्रिमंडळाने घेतलेला निर्णय रद्द करुन मनमोहन सिंग यांचा अपमान केला होता,’ अशा शब्दांमध्ये अमित शहा यांनी राहुल गांधीवर हल्लाबोल केला.

बुधवारी राज्यसभेत बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मनमोहन सिंग यांच्यावर खोचक शब्दांमध्ये टीका केली. ‘स्वातंत्र्यानंतरच्या ७० वर्षांपैकी ३५ वर्षे मनमोहन सिंग देशाच्या आर्थिक व्यवस्था आणि त्यासंबंधीचे निर्णय यांचा महत्त्वपूर्ण भाग होते. मात्र इतके वर्षे निर्णय व्यवस्थेचा भाग असूनही मनमोहन सिंग यांच्यावर एकही आरोप झाला नाही. आजूबाजूला भ्रष्टाचार होत असताना मनमोहन सिंग मात्र स्वच्छ होते. बाथरुममध्ये रेनकोट घालून अंघोळ करण्याची कला मनमोहन सिंग यांच्याकडून शिकायला हवी,’ अशा शब्दांमध्ये पंतप्रधान मोदींनी मनमोहन सिंग यांच्यावर टीका केली होती.