पाच टप्प्यांमध्ये होत असलेल्या झारखंड विधानसभेच्या पहिल्या टप्प्यात १३ मतदारसंघांमध्ये शनिवारी सुमारे ६२.८७ टक्के मतदान झाले. महाराष्ट्रामधील सत्तासंघर्षानंतर झारखंडमध्ये भाजपाने संपूर्ण ताकदीने लढण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळेच मागील काही दिवसांपासून राज्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या सभा घेण्यात येत आहेत. मात्र काही दिवसांपूर्वी झालेल्या अमित शाह यांच्या सभेला गर्दी न झाल्याने त्यांनी आपल्या भाषणामधून नाराजी व्यक्त केली.

चतरा येथे शाह यांची प्रचारसभा काही दिवसांपूर्वी झाली. या सभेला संबोधित करण्यासाठी शाह आले होते. मात्र सभेला अपेक्षित गर्दी न झाल्याने ते नाराज झाले आणि त्यांनी आपली नाराजी भाषणामधून व्यक्त केली. भाषणाची सुरुवात करतानाच शाह यांनी गंभीर स्वरामध्ये, ‘१५-२० हजारची गर्दी जमा केली तर आमदार बनता येईल का?’ असा सवाल मंचावरील नेत्यांना आणि समर्थकांना विचारला. ‘मी व्यापारी आहे. मला गणित चांगलं येतं. एवढ्याश्या गर्दीने आमदार बनता येत नाही,’ असा टोलाही शाह यांनी स्थानिक नेत्यांना लगावला.

“हे बघा, १०-१५ हजार लोकांची गर्दी केली तर आपण जिंकू का? जिंकू का? नाही… नाही जिंकणार आपण. मला गणित येतं. मी स्वत: एक व्यापारी आहे. मला फसवणं शक्य नाही. एक गोष्ट सांगितली तर करणा का? मोदींना तुम्ही आशिर्वाद देणार का? पुन्हा रघुवर सरकार सत्तेत आणणार का? रघुवर यांनी फोन दिले आहेत ते बाहेर काढा आणि आश्वासन द्या की 25-25 लोकांना तुम्ही फोन कराल. मामाला, मामीला, काकाला, आत्याला, आजी, आजोबांना, भावांना एकूण 25 फोन करायचे आहेत. फोन करुन समोरच्या व्यक्तीला कमळासमोरचे बटण दाबायला सांगा,” असं शाह आपल्या भाषणामध्ये म्हणाले.

नक्की वाचा >> महाराष्ट्रातील घडामोडींचा झारखंडच्या निवडणुकीवर परिणाम?

शाह यांनी मंचावरुन स्थानिक नेत्यांना सुनावल्यानंतरही गर्दी जमवण्यास अपयशी ठरलेल्या स्थानिक नेत्यांवरील त्यांचा राग शांत झाला नाही. एवढी कमी गर्दी असेल तर आपण निवडणूक जिंकणार नाही. शाह यांनी मंचावरील नेत्यांना असं खडसावलं तेव्हा माईक सुरु असल्याने उपस्थितांनाही शाह यांचे वक्तव्य ऐकू गेल्याचे ‘द टेलिग्राफ’ने दिलेल्या वृत्तामध्ये म्हटलं आहे.

झारखंड विधानभेच्या ८१ जागांकरिता निवडणूक होत असून, पहिल्या टप्प्यात १३ मतदारसंघांत येत्या मतदान झाले आहे. लोकसभा निवडणुकीत झारखंडमध्ये भाजपने १४ पैकी ११ जागा जिंकल्या. विधानसभा निवडणुकीत पुन्हा सत्तेत येण्याचा पक्षाचा प्रयत्न असला तरी अडथळ्यांची मालिका मोठी आहे.