वयाची साठी ओलांडलेल्या नेत्यांनी राजकारणातून निवृत्त व्हावे आणि समाजकारणात स्वतःला झोकून द्यावे, असे मत भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी व्यक्त केले. मात्र, हा टोला भाजपच्या ज्येष्ठ नेत्यांना असल्याचे म्हटले जात आहे. त्यावर अमित शाह यांनी स्पष्टीकर देत आपल्या वक्तव्याचा विपर्यास केला जात असल्याचे म्हटले आहे.
बिहार विधानसभा निवडणुकीत भाजपच्या पराभवानंतर त्यांच्याच पक्षातील ज्येष्ठ नेत्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांच्यावर शरसंधान साधले होते. चित्रकुट येथे स्वामी रामभद्राचार्य यांची भेट घेतल्यानंतर शाहांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी प्रचारक नानाजी देशमुख यांचा दाखला दिला.  ते म्हणाले की,  नानाजी देशमुख यांनी साठीनंतर राजकीय संन्यास घेऊन समाजसेवेत लक्ष घातले. नानाजी हे सर्व राजकारण्यांसाठी एक चांगले उदाहरण आहे. राजकारण्यांनी वयाची साठी ओलांडल्यानंतर सामाजिक कामात स्वतःला झोकून द्यावे.  मात्र, त्यांच्या या वक्तव्यावर टीका झाल्यानंतर ‘आज चित्रकुटमध्ये झालेल्या स्व. नानाजी देशमुख यांच्याबद्दल दिलेल्या भाषणाचा विपर्यास करण्यात आला आहे. मी कुठेही असे बोललो नाही.’ असे स्पष्टीकरण शहा यांनी ट्विटरवर दिले.