दिल्लीतील प्रतिष्ठित जवाहरलाल नेहरु विद्यापीठ (जेएनयू) येथे काल रात्री काही चेहरे झाकलेल्या गुंडांनी विद्यार्थ्यांवर आणि प्राध्यापकांवर जीवघेणा हल्ला केला. हा हल्ला अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या (अभाविप) विद्यार्थी कार्यकर्त्यांनी केल्याचा आरोप जेएनयूच्या विद्यार्थ्यांनी केला आहे. दरम्यान, या हल्ल्याच्या निषेधार्थ देशभरातील विद्यार्थी संघटना मध्यरात्रीपासूनच रस्त्यावर उतरल्या असून ठिकठिकाणी आंदोलने सुरु आहेत. या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी दिल्ली पोलिसांनी या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले आहेत.

अमित शाह यांनी दिल्लीचे पोलीस आयुक्त अमुल्य पटनाईक यांच्याशी याबाबत चर्चा केली असून वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडून या हिंसाचाराच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. एएनआयने याबाबत माहिती दिली आहे. जेएनयूतील हिंसाचाराबाबत केंद्रीय गृहमंत्र्यांचं दिल्ली पोलिसांशी बोलणं झालं असून याबाबत आवश्यक कार्यवाही करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्याचबरोबर पोलीस सहआयुक्त दर्जाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून याची चौकशी करण्याचे तसेच लवकरात लवकर याबाबतचा अहवाल देण्याचे आदेश शाह यांनी दिले आहेत, असे एएनआयच्या ट्विटमध्ये म्हटले आहे.

दरम्यान, मनुष्यबळ विकास मंत्रालयाने या हल्ल्याबाबत विद्यापीठाचे निबंधक प्रमोद कुमार यांच्याकडून तातडीने अहवाल मागवला आहे. देशभरातील बुद्धिवंत, विविध क्षेत्रातील मान्यवर आणि विरोधी पक्षांनी या हल्ल्याचा तीव्र शब्दांत निषेध केला आहे. हल्ल्यामागे केंद्रातील सत्ताधारी भाजपचा हात असल्याचा आरोप आप’सह अनेक विरोधी पक्षाच्या नेत्यांनी केला आहे.

चेहरा झाकून घेतलेल्या ‘अभाविप’चे सदस्य पोलिसांच्या उपस्थितीतच लाठय़ा-काठय़ा, लोखंडी शिगा आणि हातोडे घेऊन जेएनयूत घुसले. त्यांनी भिंतींवर चढून वसतिगृहांमध्ये प्रवेश केला आणि विद्यार्थ्यांवर हल्ला चढवला. अनेक विद्यार्थी आणि प्राध्यापकही या हल्ल्यात जखमी झाले आहेत. ‘अभाविप’च्या सदस्यांनी विद्यार्थी संघटनेची अध्यक्ष आयुषी घोष हिच्यावर हल्ला करून तिला गंभीर जखमी केले असून तिच्या डोक्यातून मोठय़ा प्रमाणावर रक्तस्राव सुरू असल्याची माहिती जेएनयू विद्यार्थी संघटनेने दिली. ‘अभाविप’ने हा आरोप फेटाळला आहे. या हल्ल्यामागे एसएफआय, एआयएसएफ आणि डीएसएफ या संघटनांचा हात असून आमचे २५ सदस्य जखमी झाल्याचे ‘अभाविप’नेम्हटले आहे.