भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष यांनी केंद्रीय मंत्रिपदाची शपथ घेतली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधान म्हणून शपथ घेतल्यानंतर राजनाथ सिंग यांनी केंद्रीय मंत्री म्हणून शपथ घेतली. त्यानंतर तिसऱ्या क्रमांकावर अमित शाह यांनी केंद्रीय मंत्री म्हणून शपथ घेतली. अमित शाह यांना कोणतं खातं देण्यात आलं आहे ते स्पष्ट होणार आहे मात्र त्यांना केंद्रीय मंत्रिपद देण्यात आलं आहे. त्यांच्याकडे कोणत्या खात्याचा कार्यभार देण्यात येणार याची उत्सुकता आता ताणली गेली आहे. अमित शाह यांची केंद्रीय मंत्रीपदावर निवड झाल्यावर आता भाजपाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी कोण बसणार याचीही चर्चा रंगली आहे.

अमित शाह यांचा केंद्रीय मंत्रिमंडळात समावेश होता जाईल असा अंदाज विविध राजकीय तज्ज्ञांकडून वर्तवला जात होता जो खरा ठरला आहे. त्यांना केंद्रीय मंत्री म्हणून राष्ट्रपती भवनातल्या शपथविधी सोहळ्यात शपथ देण्यात आली आहे. अमित शाह यांच्या अध्यक्षतेखाली २०१४ आणि २०१९ च्या लोकसभा निवडणुका पार पडल्या. ज्यामध्ये भाजपाला घवघवीत यश मिळालं. आता त्यांना मंत्री म्हणून केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान मिळाल्यानंतर भाजपाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी कोण विराजमान होणार हा प्रश्न चर्चिला जातो आहे.अमित शाह यांच्या नावाची घोषणा होताच उपस्थित भाजपा समर्थकांनी टाळ्यांचा कडकडाट केला.