मोदी सरकारचा ‘थिंक टँक’ असलेले भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा लवकरच संसदेत प्रवेश करणार आहेत. काल दिल्लीत झालेल्या भाजपच्या संसदीय मंडळाच्या बैठकीत अमित शहा यांना गुजरातमधून राज्यसभेवर पाठवण्याचा निर्णय घेण्यात आला. येत्या ८ तारखेला गुजरातमधील राज्यसभेच्या जागांसाठी निवडणूक होत आहे. सध्या शहा हे गुजरातचे आमदार आहेत. या वर्षाच्या अखेरीस गुजरातमध्ये विधानसभेची निवडणूक होत आहे. त्यामुळे अमित शहा ही निवडणूक लढवणार किंवा नाही, याबाबत साशंकता होती. मात्र, आता ते राज्यसभेवर जाणार हे निश्चित झाल्याने त्यांच्या गुजरातच्या राजकारणात परतण्याच्या शक्यता पूर्णपणे मावळल्या आहेत. गुजरातमधील एकूण ११ राज्यसभा सदस्यांचा कार्यकाळ येत्या १८ ऑगस्ट रोजी संपत आहे. यामध्ये स्मृती इराणी आणि दिलीप भाई पंड्या यांचाही समावेश आहे.

केंद्रीय मंत्री जे.पी. नड्डा यांनी काल संसदीय मंडळाच्या बैठकीत झालेल्या चर्चेची माहिती प्रसारमाध्यमांना दिली. यावेळी त्यांनी म्हटले की, गुजरातमधून पक्षाचे अध्यक्ष अमित शहा आणि स्मृती इराणी या राज्यसभेवर जातील. तर मध्य प्रदेशातील राज्यसभेच्या एकमेव जागेसाठी संपतिया उइके यांना उमेदवारी देण्यात आली आहे. माजी पर्यावरण मंत्री अनिल दवे यांच्या निधनानंतर राज्यसभेची ही जागा रिक्त झाली होती. त्यामुळे या ठिकाणी पोटनिवडणूक होत आहे.

२०१४ मध्ये भाजपला लोकसभा निवडणुकीत ऐतिहासिक यश मिळाल्यानंतर अमित शहा यांच्याकडे केंद्रीय गृहमंत्रीपद दिले जाणार असल्याची चर्चा होती. त्यानंतर देशभरातील बहुतांश निवडणुकीत अमित शहा यांच्या अचूक रणनीतीमुळेच भाजपच्या विजयाचा वारू चौखूर उधळला. तर स्मृती इराणी या २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत अमेठी मतदारसंघातून काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्याविरुद्ध निवडणूक लढवली. मात्र, त्यावेळी त्यांचा पराभव झाला होता. परंतु, केंद्रात भाजपचे सरकार आल्यानंतर त्यांच्याकडे मनुष्यबळ विकास खात्यासारखी मोठी जबाबदारी सोपवण्यात आली. त्यानंतर झालेल्या मंत्रिमंडळाच्या फेररचनेत त्यांच्याकडील मनुष्यबळ खाते काढून घेऊन इराणी यांना केंद्रीय वस्त्रोद्योग खाते देण्यात आले. मात्र, व्यंकय्या नायडू यांची उपराष्ट्रपतीपदाचा उमेदवार म्हणून निवड झाल्यानंतर काही दिवसांपूर्वीच इराणी यांच्याकडे माहिती व प्रसारण मंत्रालयाचाही कारभार सोपवण्यात आला.