शहा -उद्धव यांच्यात चर्चा; १९९५ च्या जागावाटप सूत्राचा सेनेचा प्रस्ताव

प्रदीप कौशल, एक्स्प्रेस वृत्तसेवा, नवी दिल्ली

लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर विरोधकांच्या एकजुटीमुळे भाजपने शिवसेनेशी युतीच्या प्रयत्नांना सोमवारी वेग दिला. भाजप अध्यक्ष अमित शहा यांनी सोमवारी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना फोन करून जागावाटपाबाबत चर्चा केली. मात्र, उद्धव यांनी ‘मोठय़ा भावा’चा आग्रह कायम ठेवत १९९५ च्या जागावाटप सूत्राचा प्रस्ताव शहांपुढे ठेवल्याचे सूत्रांनी सांगितले.

पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांत झालेली खराब कामगिरी आणि देशपातळीवर विरोधकांची होत असलेली आघाडी या पाश्र्चभूमीवर भाजपने मित्रपक्षांच्या मनधरणीचे प्रयत्न सुरू केले आहेत. निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी नुकतीच ‘मातोश्री’वर जाऊन उद्धव ठाकरे यांची भेट घेत युतीसाठी शिष्टाई केली होती. त्यातच सोमवारी भाजप अध्यक्ष अमित शहा यांनी उद्धव यांना फोन करून जागावाटपाची चर्चा केली. शहा यांचा केवळ लोकसभेपुरता जागावाटपाचा आग्रह आहे. मात्र, लोकसभेबरोबरच विधानसभेसाठीही जागावाटप व्हावे, अशी उद्धव यांची भूमिका आहे. त्यासाठी उद्धव यांनी १९९५ चे जागावाटप सूत्र मांडले, असे समजते. त्यावेळी शिवसेनेने १६९ तर भाजपने ११६ जागा लढवल्या होत्या. त्या निवडणुकीत शिवसेना-भाजप या पक्षांनी १३८ जागा जिंकून युतीचे पहिले सरकार राज्यात स्थापन केले होते. जागावाटपाच्या या सूत्रानुसार राज्यात युतीचे सरकार आले तर मुख्यमंत्रीपदावर शिवसेनेचाच दावा असणार आहे.

युतीसाठी लोकसभेचे जागावाटप कसे असेल, हे अद्याप निश्चित नाही. मात्र, राज्याच्या विधानसभेत भाजपचे संख्याबळ १२२ असताना १९९५ च्या जागावाटप सूत्रानुसार हा पक्ष ११६ जागा लढवणार का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. तसेच आपणच मोठे भाऊ आहोत, या भूमिकेपासून आपण हटणार नाही, असे स्पष्ट संकेत शिवसेनेने दिल्याने जागावाटपाचा तिढा कायम आहे.

टीडीपी, आरएलएसपी, आसाम गण परिषद हे पक्ष ‘रालोआ’मधून बाहेर पडल्याने भाजप मित्रपक्ष टिकवून ठेवण्याच्या प्रयत्नात आहे. नवे मित्रपक्ष जोडण्याचाही भाजपचा प्रयत्न आहे. त्यात जागावाटप हा अडचणीचा मुद्दा आहे.

नायडूंना पाठिंबा हे दबावतंत्र?

शहा यांचे उद्धव यांना चुचकारण्याचे प्रयत्न सुरू असताना शिवसेना खासदार संजय राऊत यांनी सोमवारी सायंकाळी आंध्रभवन येथे जाऊन चंद्राबाबू नायडू यांच्या उपोषणाला पाठिंबा दिला. नायडू यांच्या उपोषणाच्या निमित्ताने विरोधकांनी पुन्हा एकजुटीचे दर्शन घडविले. त्याच मंचावर हजेरी लावून राऊत यांच्याद्वारे शिवसेनेने भाजपवर दबावतंत्राचा वापर केल्याची चर्चा आहे.