भाजप अध्यक्ष अमित शहा यांच्यामुळे मेहबुबा मुफ्ती यांच्या मनसुब्यांवर पाणी
जम्मू-काश्मीरचे दिवंगत मुख्यमंत्री मुफ्ती मोहम्मद सईद यांच्या निधनानंतर भारतीय जनता पक्षाच्या मदतीऐवजी काँग्रेसला सत्तास्थापनेसाठी हाक देणाऱ्या पीडीपीची रणनीती अयशस्वी ठरण्याची चिन्हे आहेत. काँग्रेस व तीन अपक्ष आमदारांच्या सहकार्याने सत्ता स्थापनेची तयारी पीडीपीच्या नेत्या मेहबुबा मुफ्ती यांनी केली होती. परंतु या तीनही आमदारांशी ‘अर्थ’पूर्ण चर्चा करून भाजप अध्यक्ष अमित शहा यांनी मेहबुबा मुफ्ती यांच्या मनसुब्यांवर पाणी फेरले आहे.
या तीन आमदारांनी अमित शहा यांची भेट घेतल्याचे वृत्त आहे. शहा यांनी या आमदारांना पीडीपी व काँग्रेसला पाठिंबा देण्यापासून रोखले आहे. पीडीपीचे २८ तर काँग्रेसचे १२ आमदार आहेत. सत्तास्थापनेसाठी तीन अपक्ष आमदारांना सोबत घेण्याचा खटाटोप पीडीपी नेते करीत होते. परंतु शहा यांनी पीडीपीची कोंडी केली आहे. भाजपचे २५ आमदार आहेत.
भाजप सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मेहबुबा मुफ्ती यांनी मुख्यमंत्री होण्यास भाजपचा विरोध नाही. परंतु पीडीपीला भाजपला सत्तास्थापनेत वाटा द्यायचा नाही. त्यामुळे अपक्ष आमदारांना हाताशी धरून भाजपने राजकीय कोंडी केली आहे.
अपक्ष आमदारांच्या मदतीवर सत्ता स्थापन करणे हा एकमेव पर्याय पीडीपी व काँग्रेससमोर आहे. काहीही झाले तरी पीडीपी, नॅशनल कॉन्फरन्स व काँग्रेस एकत्र येणे अशक्य आहे. त्यामुळे आम्ही अपक्ष आमदार तटस्थ राहतील यांची व्यवस्था केली आहे. त्यावर मेहबुबा मुफ्ती यांनीदेखील अप्रत्यक्षपणे मध्यावधी निवडणुकीचे संकेत दिले आहेत. दिवंगत मुफ्ती मोहम्मद सईद यांच्यावर एम्समध्ये उपचार सुरू असताना एकदाही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रत्यक्ष जाऊन त्यांची चौकशी केली नाही. हे मेहबुबा मुफ्ती यांच्या नाराजीचे प्रमुख कारण सांगण्यात येत आहे.

राजकीय अनिश्चितता संपणार?
जम्मू-काश्मीरमध्ये पीडीपी व भाजपचा आघाडीबाबत काहीच निर्णय होत नसल्यामुळे राजकीय अनिश्चितता संपवण्याचा प्रयत्न म्हणून राज्यपाल एन. एन. व्होरा यांनी दोन्ही पक्षांच्या प्रमुखांना सरकार स्थापनेबाबत त्यांची भूमिका स्पष्ट करण्यासाठी मंगळवारी पाचारण केले आहे. माजी मुख्यमंत्री मुफ्ती मोहम्मद सईद यांच्या निधनानंतर दुसऱ्या दिवसापासून, म्हणजे ८ जानेवारीपासून राज्यपाल राजवटीखाली असलेल्या जम्मू- काश्मीरमध्ये सरकार स्थापण्याबाबत चर्चा करण्यासाठी पीडीपीच्या अध्यक्ष मेहबुबा मुफ्ती व भाजपचे प्रदेशाध्यक्ष सतपाल शर्मा यांना राज्यपालांनी मंगळवारी वेगवेगळ्या वेळी भेटीसाठी बोलावले आहे.