भारतीय जनता पार्टीचे (भाजपा) अध्यक्ष अमित शाह यांनी बुधवारी एनडीएच्या नेतृत्व बदलाची गोष्ट नाकारली आहे. ते म्हणाले की, सत्तारुढ एनडीए सरकार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालीच २०१९ची निवडणूक लढवणार आहे. एका वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमात ते बोलत होते.

शाह म्हणाले, नेतृत्व बदलाचा प्रश्नच येत नाही, मोदींच्या नेतृत्वाखालीच एनडीए २०१९ची निवडणूक लढवेल. वाहिनीच्या संपादकांनी विचारलेल्या यासंबंधीच्या प्रश्नावर ते म्हणाले की, २०१४ मध्ये केवळ सहा राज्यांमध्ये भाजपाची सत्ता होती, आता ती १६ राज्यांमध्ये आहे. मग आपणच सांगा की कोण जिंकेल?

शाह म्हणाले की, राज्य आणि केंद्रामध्ये निवडणुका विविध मुद्द्यांवर लढल्या जातात. त्यानुसार २०१९ ची सार्वत्रिक निवडणूक देश पातळीवरील मुद्द्यांवर लढवली जाईल. महाराष्ट्रातील प्रमुख शेतकरी नेते आणि वसंतराव नाईक स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत आणि महासचिव भैयाजी जोशी यांना पत्र लिहिल्यानंतर शाह यांचे हे विधान महत्वपूर्ण मानले जात आहे.

तिवारी यांनी पत्रात म्हटले होते की, जर भाजपाला २०१९ची निवडणूक जिंकावी असं वाटत असेल तर त्यांनी अहंकारी मोदींना हटवून विनम्र नितीन गडकरी यांना त्यांच्या जागी बसवावे.