नोटाबंदीनंतर सर्वाधिक जुन्या नोटा अमित शाह संचालक मंडळावर असलेल्या अहमदाबाद जिल्हा सहकारी बँकेत जमा झाल्याची माहिती समोर आली आहे. नोटाबंदीनंतर अवघ्या पाच दिवसांमध्ये या बँकेत ७४५. ५९ कोटी रुपयांच्या जुन्या नोटा जमा झाल्याचे उघड झाले आहे. माहिती अधिकाराअंतर्गत मागवलेल्या माहितीमधून ही बाब समोर आली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ८ नोव्हेंबर २०१६ रोजी नोटाबंदी जाहीर केली होती. यानंतर हजार आणि पाचशे रुपयांच्या जुन्या नोटा चलनातून बाद करण्यात आल्या होत्या. नोटाबंदीनंतर १० नोव्हेंबरपासून बँका व पोस्ट कार्यालयातून जुन्या नोटा बदलून नवीन देण्यात येत होत्या, मात्र पाच दिवसांनी देशभरातील जिल्हा बँकांना जुन्या नोटा स्वीकारण्यास मनाई करण्यात आली. या पाच दिवसांच्या काळात जमा झालेल्या नोटा सरकारकडून बदलून देण्यात आल्या.

मुंबईतील माहिती अधिकार कार्यकर्ते मनोरंजन रॉय यांनी माहिती अधिकाराअंतर्गत जिल्हा बँकेत जमा झालेल्या जुन्या नोटासंदर्भातील माहिती मागवली. यात अहमदाबाद जिल्हा बँकेने सर्वाधिक जुन्या नोटा जमा केल्याचे समोर आले आहे. बँकेत नोटाबंदीच्या काळात ७४५. ५९ कोटी रुपयांच्या जुन्या नोटा जमा झाल्या. बँकेच्या वेबसाईटवर अमित शाह बँकेच्या संचालक मंडळावर असल्याचे दिसते. २००० साली अमित शाह बँकेच्या अध्यक्षपदी होते. यानंतर राजकोट जिल्हा सहकारी बँकेचा क्रमांक लागतो. या बँकेने सुमारे ६९३ कोटी रुपयांच्या जुन्या नोटा जमा केल्या. या मुद्द्यावरुन विरोधक भाजपावर टीका करण्याची शक्यता आहे.