भाजपा आंध्र प्रदेश सरकारबाबत खोटी माहिती पसरवण्यास सुरुवात केली असून अमित शहांनी आपल्याला लिहिलेल्या पत्रातील माहिती धादांत खोटी असल्याचा पलटवार टीडीपीचे प्रमुख आणि आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी केला आहे.

नायडू म्हणाले, अमित शहांनी त्यांच्या पत्रात आंध्रला केंद्राने अनेक वेळा निधी दिला असून आम्ही त्याचा उपयोग केला नाही असे म्हटले आहे. यावरुन आमचे सरकार आंध्रचा विकास करण्यात सक्षम नाही असेच त्यांनी याद्वारे सुचवले आहे. मात्र, मी त्यांना सांगू इच्छितो की, आमच्या सरकारचा जीडीपी उत्तम असून कृषी क्षेत्रासह अनेक पुरस्कार आम्ही पटकावले आहेत. ही आमची क्षमता आहे. त्यामुळे तुम्ही खोटं नाटं पसरवण्याचे काम का करीत आहात? असा सवाल त्यांनी केला आहे.

शहा यांच्या पत्रातील माहिती धादांत खोटी असून यावरुन केंद्र सरकारचा दृष्टीकोन दिसून येतो. सध्या केंद्र सरकार ईशान्य भारतासाठी विशेष पॅकेज देत आहे. मात्र, आम्हाला त्यांनी मदत नाकारल्याचा आरोप त्यांनी केला. मात्र, आमच्या सरकार राज्यात चांगले काम करीत असून येथे अनेक उद्योग येण्यास तयार असल्याचे स्पष्टीकरण नायडू यांनी दिले आहे.

दरम्यान, टीडीपीने एनडीएतून बाहेर पडण्यावर प्रतिक्रिया देताना अमित शहांनी चंद्राबाबू नायडूंना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे की, टीडीपीचा एनडीएतून बाहेर पडण्याचा हा निर्णय राजकीय हेतूने प्रेरित आणि एकतर्फी आहे. आंध्र प्रदेशच्या विकासाबाबत मोदी सरकार कटिबद्ध असून त्यावर कोणी शंका घेऊ शकत नाही. यावरुन तुम्ही राज्याच्या विकासाकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप शहा यांनी केला. भाजपा नेहमीच विकासाच्या राजकारणावर विश्वास ठेवणारा पक्ष असून हीच आमची प्रेरणा असल्याचे शहा यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे. शहा यांनी या पत्राच्या माध्यमातून काँग्रेसवरही टीका करण्याची संधी सोडली नाही. काँग्रेसमुळेच तेलुगू जनतेची अवहेलना होत असल्याचा आरोप त्यांनी केला. उगादीच्या शुभेच्छा देत त्यांनी पत्राची सुरूवात केली होती.

आंध्र प्रदेशच्या विभाजनापासून आजपर्यंत भाजपाने नेहमी आंध्र प्रदेशच्या लोकांसाठी आवाज उठवला आहे. लोकांच्या हितासाठी काम केले आहे. आम्ही सातत्याने तेलुगू जनता आणि तेलुगू राज्याच्या हिताबाबत विचार केला आहे. काँग्रेसने राज्याचे विभाजन करताना लोकांच्या हिताची काळजी घेतली नाही. त्यामुळे लोकांना मोठ्या अडचणीचा सामना करावा लागतोय. तुमच्याकडे राज्यसभा आणि लोकसभेत पुरेशा जागा नव्हत्या. तेव्हाही भाजपाने राज्यातील लोकांना न्याय देण्याच्या विषयांना सभागृहात प्राथमिकता दिली होती, असेही शहा यांनी पत्रात लिहिले आहे.