भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांच्या जीवाला धोका असल्यामुळे त्यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. त्यांना आता एएसएलचे सुरक्षा कवच मिळाले आहे. देशातील निवडक व्यक्तींना ही सुरक्षा देण्यात येते. आतापर्यंत त्यांना झेड प्लस सुरक्षा देण्यात येत होती. गुप्तचर विभागाच्या समीक्षेनंतर गृहमंत्रालयाने त्यांच्या सुरक्षेत वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. या सुरक्षेअंतर्गत शाह यांना ज्या भागाचा दौरा करायचा आहे. तिथे सर्वांत आधी एएसएलचे पथक जाऊन सुरक्षेच्या दृष्टीने पाहणी करेल आणि त्यांच्या सुरक्षेसंबंधीच्या सूचनांचे राज्यांच्या पोलीस प्रशासनाला पालन करावे लागेल.

एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, गृहमंत्रालयाने सर्व राज्यांना अमित शाहंच्या नव्या सुरक्षा व्यवस्थेशी निगडीत प्रक्रियेचे पालन करण्याचे निर्देश दिले आहेत. शाह यांच्या दौऱ्याच्या दोन आठवड्यांपूर्वी एएसएलचे पथक कार्यक्रमस्थळी जाऊन निरीक्षण करेल. काही दिवसांपूर्वीच अमित शाह यांच्या सुरक्षेसंबंधी एक समीक्षा बैठक झाली होती. यामध्ये आयबीने त्यांना उच्च स्तरीय धोका असलेल्या व्यक्तींना देण्यात येणारी सुरक्षा पुरवण्याची शिफारस केली. शाह यांना २४ तास सीआरपीएफच्या जवानांची सुरक्षा देण्यात येईल. त्याचबरोबर ३० कमांडो प्रत्येक क्षणी त्यांच्या अवतीभोवती असतील. त्याचबरोबर त्यांच्या सुरक्षेत राज्यातील स्थानिक पोलीसही असतील.

सध्या एएसएलचे पथक राष्ट्रपती रामनाथ कोविंद, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री राजनाथ सिंह यांना सुरक्षा सेवा देतात. दरम्यान, ज्यांच्या जीवाला धोका असतो, त्यांना विविध प्रकारच्या सुरक्षा पुरवण्यात येतात. एसपीजी, झेड प्लस, झेड, वाय आणि एक्स श्रेणीची सुरक्षा देण्यात येते. वेळोवेळी या व्यक्तींच्या सुरक्षेची समीक्षा केली जाते. त्यानुसार संबंधित व्यक्तीची सुरक्षा वाढवायची किंवा कमी करायची याचा निर्णय घेतला जातो.