फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाच्या (एफटीआयआय) अध्यक्षपदावरून सुरू असलेल्या गोंधळात एका धक्कादायक वास्तवाची भर पडली आहे. एफटीआयआयच्या अध्यक्षपदासाठी सहा महिन्यांपूर्वी संभाव्य उमेदवारांची जी यादी तयार करण्यात आली होती. त्यामध्ये अमिताभ बच्चन, रजनीकांत आणि श्याम बेनेगल अशा दिग्गजांची नावे संस्थेच्या अध्यक्षपदासाठी सुचविण्यात आली होती. मात्र, सरकारने या सगळ्यांना डावलून गजेंद्र चौहान यांच्याकडे एफटीआयआयचा कारभार सोपविण्याचा निर्णय घेतल्याचे उघड झाले आहे. त्यामुळे आता सरकारच्या अडचणीत चांगलीच भर पडण्याची शक्यता आहे.
विशेष म्हणजे जेव्हा सहा महिन्यांपूर्वी ही यादी तयार करण्यात आली तेव्हा गजेंद्र चौहानांचे नावही चर्चेत नव्हते. एफटीआयआयला सर्वोत्तम स्थानी नेऊन ठेवू शकतील, अशा या मान्यवरांची यादी माहिती आणि प्रसारण खात्यातर्फे गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये तयार केली होती. मंत्रालयाच्या उच्चाधिकाऱ्यांनी त्याला मंजुरीही दिली होती. यामध्ये अमिताभ बच्चन, रजनीकांत, विधु विनोद चोप्रा, जान्हु बरुआ अशी बडी नावे या यादीत असल्याने यांपैकी एकाची अध्यक्षपदासाठी निवड होईल, अशी अटकळ बांधली जात होती. मात्र, अचानकपणे सूत्रे फिरली आणि केंद्र सरकारनं यादीकडे दुर्लक्ष करत अध्यक्षपदासाठी गजेंद्र चौहान यांची निवड केली. सरकारला भाजपशी संबंधित नेता किंवा निष्ठावंत कार्यकर्त्याची या पदावर वर्णी लावायची होती. त्यामुळे सुरूवातीला अभिनेते अनुपम खेर यांच्या नावावर चर्चा झाली. त्यांची पत्नी भाजपच्या खासदार असल्याने आणि चित्रपटसृष्टीत अनुपम खेर यांचे योगदानही मोठे असल्याने काहींनी त्यावर सहमती दर्शवली होती. परंतु, सरतेशेवटी या सगळ्या दिग्गजांना बाजूला करत सरकारने टीव्ही अभिनेते गजेंद्र चौहान यांच्या गळ्यात अध्यक्षपदाची माळ घातली.