बॉलिवूड शहेनशाह बिग बी अमिताभ बच्चन यांनी बिहारमधील दोन हजारहून अधिक शेतकऱ्याचं कर्ज फेडल्यानंतर आता त्यांनी पुलवामा हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांच्या कुटुंबियांसाठी मदतीचा हात पुढे केला आहे. अमिताभ यांनी शहीद झालेल्या प्रत्येक जवानांच्या कुटुंबीयांना ५ लाख रुपयांची मदत केली आहे. त्यांनी ट्विटरच्या माध्यमातून ही माहिती दिली आहे.

अमिताभ बच्चन यांनी भारतीय प्रशासन आणि जवानांच्या खासगी खात्यांच्या मदतीने पाच लाख रुपयांची मदत केली आहे. ही मदत केल्यानंतर ‘माझी एक इच्छा पूर्ण झाली’, असं त्यांनी म्हटलं आहे.

“मनात बाळगलेली आणखी एक इच्छा पूर्ण झाली. त्यांच्या कुटुंबीयांना मदत करण्याची इच्छा होती, ती मी पूर्ण केली. सीआरपीएफ अधिकाऱ्यांच्या समोर मी ही मदत केली आहे”, असं म्हणत त्यांनी एक ट्विट केलं आहे.

दरम्यान, बिहारमधील शेतकऱ्यांना मदत केल्यानंतर पुन्हा एकदा सामाजिक भान जपत बिग बींनी शहीद जवानांच्या कुटुंबीयांना मदत केल्यामुळे सध्या त्यांच्यावर सर्व स्तरांमधून कौतुकाचा वर्षाव होत आहे. फेब्रुवारी महिन्यामध्ये सीआरपीएफ जवानांच्या वाहनांच्या ताफ्यावर जैश-ए-मोहम्मद या अतिरेकी संघटनेकडून आत्मघाती हल्ला करण्यात आला होता. या हल्ल्यामध्ये ४० जवान शहीद झाले होते.