बोफोर्स प्रकरणात निर्दोष असूनही माझ्यावर करण्यात आलेल्या आरोपांच्या वेदनेतून बाहेर येण्यास २५ वर्षे लागली, अशी आठवण हिंदी चित्रपटसृष्टीतील महानायक अमिताभ बच्चन यांनी आपल्या ब्लॉगमधून मांडली आहे. या प्रकरणात माझ्यावर आणि माझ्या कुटुंबीयांवर आरोप लावण्यात आल्यावर खूप वेदना झाल्या होत्या. माझ्या व्यक्तिमत्त्वावरच प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले होते. आपण निर्दोष आहोत, हे मला माहिती होते, पण ते अधिकृतपणे मान्य होण्यास २५ वर्षांचा कालावधी जावा लागला. या काळात खूप वेदना झाल्याचे त्यांनी म्हटले आहे.
अमिताभ यांनी ब्लॉगमध्ये लिहिले आहे की, टेक्नॉलॉजीच्या सध्याच्या जमान्यात कोणावरही आरोप करणे अगदी सहजसोपे असते. लोकांना वस्तुस्थिती काय आहे, हे फारसे जाणून घ्यायचे नसते. त्यामुळे वादग्रस्त विषयही वेगाने पसरले जातात आणि खरं काय आहे हे दिसूच शकत नाही. काही वेळा तर असे आरोप लावले जातात की तुमच्या सज्जनतेचा पायाच मोडतो.
बोफोर्स प्रकरणात स्वीडनमधील व्हिसलब्लोअरने २०१२ मध्ये मला क्लीनचीट दिली होती. पण तोपर्यंत माझ्या भोवतीचे शंकांचे आणि संशयाचे जाळे घेऊनच मला जगावे लागले, असेही त्यांनी म्हटले आहे.