पनामा पेपर्समधील माहितीच्या आधारे देण्यात आलेल्या वृत्तात दोन ठिकाणी ज्या कंपन्या स्थापन केल्याचा जो उल्लेख माझ्या नावाने आहे, त्या कंपन्यांशी काहीही संबंध नाही, माझ्या नावाचा गैरवापर करण्यात आला आहे, अशी प्रतिक्रिया सुपरस्टार अमिताभ बच्चन यांनी दिली आहे, या संबंधातील वृत्तात मी गैरप्रकार केल्याचा कुठलाही उल्लेख नाही, असा दावा त्यांनी केला.  पनामा पेपर्सवर आधारित दिलेल्या वृत्तावर बच्चन यांनी सांगितले, की दी इंडियन एक्सप्रेसने सी बल्क शिपिंग कंपनी लि, लेडी शिपिंग लिमिटेड, ट्रेजर शिपिंग लिमिटेड व ट्रॅम्प शिपिंग लिमिटेड या कंपन्यांचा उल्लेख केला आहे. या कंपन्या मला माहिती नाहीत व त्यातील कुठल्याही कंपनीचा संचालक असण्याचा प्रश्नच नाही.

आइसलँडच्या पंतप्रधानांचा राजीनामा

पनामा पेपर्समध्ये उघड झालेल्या माहितीप्रकरणी आइसलँडचे पंतप्रधान सिंगमुंदूर गुनालॉगसन यांनी राजीनामा दिला. ही कागदपत्रे उघड होण्याच्या आधीच त्यांच्यावर तेथील राजकीय परिस्थितीमुळे अविश्वास ठराव मांडण्यात आला होता. त्यातच पनामा पेपर्सची भर पडल्याने त्यांची गच्छंती अटळ होती. पनामा पेपर्समधील माहितीनुसार गुनालॉगसन यांची परदेशात विंट्रीस कंपनी असल्याचे म्हटले होते, त्यात पत्नीच्या नावावरही मालमत्ता आहे. त्यांनी परदेशात कुटुंबीयांच्या नावावर लाखो डॉलर्सची संपत्ती जमवल्याचा आरोप आहे. त्यांच्यावर आरोप झाल्यानंतर आइसलँडच्या संसदेसमोर त्यांच्या राजीनाम्यासाठी सोमवारी निदर्शने झाली होती.