बॉलीवूड बादशहा ‘बिग बी’ अमिताभ बच्चनला ऑस्ट्रेलियातील विद्यापीठातर्फे पुढील महिन्यात सन्मानित करण्यात येणार आहे. येथील ‘ला ट्रोब’ विद्यापीठातर्फे ग्लोबल सिटिझनशिप पुरस्कार देऊन ‘बिग बी’ अमिताभला गौरविण्यात येईल.
पुढील महिन्यात मेलबर्न येथे होणाऱ्या भारतीय चित्रपट महोत्सवात अमिताभ बच्चन हे उपस्थित राहणार असून त्याच सुमारास ‘ला ट्रोब युनिव्हर्सिटी ग्लोबल सिटिझनशिप अ‍ॅवॉर्ड’ देऊन अमिताभ बच्चन यांना गौरविण्यात येईल. ७० वर्षीय अमिताभ हा या पुरस्काराचा पहिला मानकरी असून याच विद्यापीठातर्फे ‘श्री अमिताभ बच्चन स्कॉलरशिप’ नावाने पीएच.डी. शिष्यवृत्ती सुरू करण्यात येणार आहे.
‘ला ट्रोब युनिव्हर्सिटी ग्लोबल सिटिझनशिप अ‍ॅवॉर्ड’ हा पुरस्कार या विद्यापीठातर्फे नव्याने सुरू करण्यात आला असून अमिताभ बच्चन हे या पुरस्काराचे पहिले मानकरी आहेत, असे या विद्यापीठाचे डेप्युटी व्हाइस चॅन्सलर प्रो. जॉन रोझेनबर्ग यांनी ‘पीटीआय’ला सांगितले.
चित्रपट कारकिर्दीत अभिनयाद्वारे बजावलेली अतुलनीय कामगिरी व आंतरराष्ट्रीय स्तरावर स्वत:ची अशी वेगळी ओळख निर्माण केल्याबद्दल अमिताभचा हा सन्मान करण्यात येणार आहे. ऑस्ट्रेलियातील विद्यापीठातर्फे  प्रतिवर्षी हा पुरस्कार देण्यात येणार असून अमिताभ बच्चन हे या विद्यापीठातर्फे देण्यात येणाऱ्या पहिल्या पुरस्कारासाठी योग्य व्यक्ती आहेत, अशी आमचा धारणा आहे आणि त्यांचा सन्मान करणे ही आमच्यासाठी अभिमानाची
गोष्ट आहे, असेही रोसेनबर्ग
म्हणाले.
२२ मे रोजी अमिताभ बच्चन यांना मानपत्र देऊन त्यांचा सन्मान करण्यात येईल. त्यानंतर त्यांच्याच नावाने दिल्या जाणाऱ्या ‘श्री अमिताभ बच्चन स्कॉलरशिप’ची घोषणा करण्यात येईल. येथील विद्यापीठांत मीडिया, फिलोसॉफी, चित्रपट आदी विषयांत पीएच.डी. करणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यांला ‘श्री अमिताभ बच्चन स्कॉलरशिप’ देण्यात येईल. संबंधित विद्यार्थ्यांला चार वर्षीय शिष्यवृत्तीसाठी सुमारे २५ हजार डॉलर इतकी रक्कम दिली जाईल.