विकासाच्या बाबतीत अमेठी हा अतिशय मागासलेला असून काही निवडक लोकांनाच विकासाची फळे चाखावयास मिळाली आहेत, अशी टीका केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी केली आहे.
शेतकरी व्यथित झाला असून त्यांच्या समस्या सोडविण्यासाठीच आपण येथे आलो आहोत, असे इराणी म्हणाल्या. प्रधानमंत्री किसान विमा योजनेबाबत माहिती देताना इराणी म्हणाल्या की, केंद्र सरकारने अमेठीमध्ये किसान विहान केंद्र मंजूर केले आहे. राज्य सरकारने त्यासाठी जमीन उपलब्ध करून दिल्यास ते लवकरच सुरू केले जाईल, असेही त्या म्हणाल्या.
जिल्ह्य़ात लवकरच रुग्णवाहिका सेवा उपलब्ध करून दिली जाईल, असेही त्या म्हणाल्या. गाव पातळीवर संघटना मजबूत करण्यासाठी भाजप युद्धपातळीवर काम करीत आहे, असेही त्यांनी सांगितले. अमेठीचा योग्य तो विकास केला जाईल असे सांगून त्यांनी संरक्षणमंत्री मनोहर र्पीकर यांनी दत्तक घेतलेल्या बरौलिया गावाचा उल्लेख केला.