पंजाबच्या अमृतसरमध्ये निरंकारी भवन येथे झालेल्या ग्रेनेड हल्ल्याप्रकरणी भटिंडामध्ये छापेमारी करण्यात आली असून येथून दोन तरुणांना अटक करण्यात आली आहे. ग्रेनेड हल्ल्याशी संबंध असल्याच्या संशयातून या दोघांना अटक करण्यात आली आहे. पंजाब पोलीस दोघांकडे चौकशी करत आहेत. अमृतसर ग्रेनेड हल्ला हा दहशतवादी हल्ला असण्याची शक्यता वर्तवली जात असून त्या अनुषंगाने स्थानिक पोलीस, एनआयए आणि अन्य यंत्रणा तपास करत आहेत. पोलिसांनी हा सकृतदर्शनी दहशतवादी हल्ला असल्याचे म्हटले आहे.

दुसरीकडे, या हल्ल्यामध्ये वापरण्यात आलेले ग्रेनेड हे पाकिस्तानमध्ये तयार करण्यात आले असल्याचा खळबळजनक खुलासा पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी केला आहे. पाकिस्तान ऑर्डनन्स फॅक्टरीचा यावर शिक्का असल्याचा दावाही त्यांनी केला आहे. रविवारी अमृतसरच्या राजासांसी परिसरातील आदिवाल गावात निरंकारी भवन येथे रविवारी ग्रेनेड हल्ला करण्यात आला होता. या स्फोटात तीन  ठार तर वीस जण जखमी झाले होते. येथील निरंकारी भवनामध्ये सत्संगाचे आयोजन करण्यात आले होते, यावेळी दोन अज्ञात तरुणांनी मंचाच्या दिशेने ग्रेनड फेकला. त्यानंतर घटनास्थळावरून पळ काढला, हे दोघेही चेहरा झाकून आले होते.

हल्लेखोरांची माहिती देणाऱ्यास ५० लाखांचे इनाम

पंजाबमध्ये अमृतसर येथे राजासांसी विमानतळ व भारत-पाक सीमेजवळ असलेल्या निरंकारी भवनात रविवारी करण्यात आलेल्या हातबॉम्ब हल्ल्यात सामील असलेल्यांबाबत महत्त्वाची माहिती देणाऱ्यास मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांनी पन्नास लाख रुपयांचे इनाम जाहीर केले आहे. पंजाब पोलिसांच्या १८१ या दूरध्वनी क्रमांकावर कुणीही या  हल्ल्याबाबत महत्त्वाची माहिती देऊ शकते. माहिती देणाऱ्याचे नाव गुप्त ठेवण्यात येईल. मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांनी सोमवारी घटनास्थळी भेट दिली. ते भेट देणार असल्याने निरंकारी भवन येथे सुरुवातीला लाल गालिचा त्यांच्या स्वागतासाठी अंथरण्यात आला होता, पण दु:खद घटना घडली असताना लाल गालिचा अंथरून मुख्यमंत्र्यांचे स्वागत होत असल्याबाबत नाराजीचा सूर येताच हिरवा गालिचा अंथरण्यात आला.