अमृतसरमधील दुर्घटनेत जमखी झालेल्या १० महिन्यांच्या चिमुरडीच्या कुटुंबीयांचा अखेर ठावठिकाणा लागला आहे. १० महिन्यांच्या मुलीची आई देखील या दुर्घटनेत जखमी झाली असून तिच्या वडिलांचा मात्र यात मृत्यू झाला आहे.

पंजाबमधील अमृतसरजवळील जोडा रेल्वे फाटकाजवळ रावण दहन पाहण्यासाठी रेल्वे रुळावर गर्दी जमली होती. यादरम्यान वेगाने आलेल्या एक्स्प्रेसची धडक बसून ५८ जण मृत्यूमुखी पडल्याची घटना शुक्रवारी संध्याकाळी घडली होती. या दुर्घटनेत १० महिन्यांची चिमुरडीही जखमी झाली होती. रेल्वे रुळालगत सापडलेल्या या चिमुरडीला एका व्यक्तीने रुग्णालयात दाखल केले होते. तिच्या आई -वडिलांबाबत कोणतीही माहिती मिळत नव्हती. तिचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. हे फोटो पाहून काही दाम्पत्यांनी अमृतसरमधील सिव्हिल रुग्णालय गाठून तिला दत्तक घेण्याची तयारीही दर्शवली. तिच्या आई – वडिलांचा या दुर्घटनेत मृत्यू झाला असावा, अशी शक्यता वर्तवली जात होती.

रविवारी त्या मुलीची ओळख पटली आहे. मुलीच्या आईचे नाव राधिका असून राधिका यांच्यावर अमृतसरमधील अमनदीप रुग्णालयात उपचार सुरु आहेत. तर तिचे वडील बुद्धीराम (वय ४०) यांचा या दुर्घटनेत मृत्यू झाला.

मुलीचे नातेवाईक दिनेश यांनी इंडियन एक्स्प्रेसला सांगितले की, आमचे संपूर्ण कुटुंब या दुर्घटनेत उद्ध्वस्त झाले आहे. कुटुंबातील सदस्य वेगवेगळ्या रुग्णालयात दाखल आहे. या सगळ्या गोंधळात आम्हाला बुद्धीरामच्या मुलीची माहिती मिळत नव्हती. बुद्धीरामची पत्नी राधिकावर एका रुग्णालयात उपचार सुरु आहेत. अखेर आज आम्हाला बुद्धिरामची मुलगी सापडली. राधिकाची बहीण प्रिती देखील रावण दहन पाहण्यासाठी गेली होती. प्रितीचे पती दिनेश आणि तिचा मुलगा अभिषेक (वय ९) या दोघांचा मृत्यू झाला आहे. तर प्रिती आणि तिचा आणखी एक मुलगा आरुष (वय ३) हे दोघे अपघातातून बचावले. राधिका आणि तिच्या मुलीची भेट घडवण्यात आली असली तरी राधिकाला अद्याप पतीच्या निधनाबाबत काहीच सांगितलेले नाही, असे त्यांनी नमूद केले. राधिका आणि तिचे कुटुंबीय हे उत्तर प्रदेशचे असून दसऱ्यानिमित्त ते अमृतसरला नातेवाईकांकडे आले होते.