रामलीलामध्ये रावणाची भूमिका साकारणारा दलबीर सिंह त्याच्या भारदस्त आवाजाने दरवर्षी उपस्थितांना टाळ्या वाजवायला भाग पाडायचा. स्थानिक नागरिकांचा तो प्रिय होता. शुक्रवारी त्यांच्या आवडत्या रावणाने 61 जणांचा जीव घेणाऱ्या रेल्वेखाली स्वतःचा जीव जाण्याआधी किमान 8 जणांचे प्राण वाचवले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

दलबीर सिंह याचा एक मित्र राजेश हा घटनेवेळी काही मिटर अंतरावर उभा होता. दलबीरने धावत जाऊन रेल्वे रुळांवर उभ्या असलेल्या किमान 8 जणांना धक्का देऊन तेथून हटवलं आणि त्यांचा जीव वाचवला, पण तो स्वतःचा जीव वाचवू शकला नाही अशी माहिती राजेशने दिली. कृष्ण लाल हा दलबीरचा एक शेजारी म्हणाला, तो दरवर्षी रावणाची भूमिका साकारायचा, त्यामुळे आम्ही नेहमी त्याची चेष्टा करायचो. आम्ही त्याला लंकेश बोलायचो. पण, शुक्रवारी त्याने जे काम केलं ते एखाद्या हिरोप्रमाणे होतं.

शुक्रवारी कार्यक्रमानंतर आपली भूमिका साकारून दलबीर रेल्वे ट्रॅकच्या दुसऱ्या बाजूला आपल्या घरी जायला निघाला होता. त्यावेळी जळणारा रावणाचा पुतळा पाहण्यासाठी तो देखील रुळांवरच उभा राहिला. पण त्याचवेळी त्याने जालंधर-अमृतसर डीएमयू ही गाडी रुळावर उभ्या असलेल्या गर्दीच्या दिशेने भरधाव वेगात येत असल्याचं पाहिलं, आणि पळत जाऊन त्याने लोकांचा जीव वाचवण्याचा प्रयत्न केला. पण तो स्वतःचा जीव वाचवण्यात अपयशी ठरला.

गेल्या वर्षीच दलबीरचं लग्न झालं होतं. दलबीरच्या मागे त्याची आई, पत्नी आणि आठ महिन्याचे बाळ असा परिवार आहे. आपल्या मुलाचा मृत्यू झाल्याने दलबीरच्या आईला धक्काच बसला आहे. दलबीरच्या आईने सरकारकडे आपल्या मुलाच्या कुटुंबासाठी काहीतरी करावे अशी मागणी केली आहे. ‘माझ्या सुनेला नोकरी द्यावी अशी मी सरकारकडे विनंती करत आहे. आठ महिन्याच्या बाळाची संपूर्ण जबाबदारी आता तिच्यावर पडली आहे’ असे दलबीरच्या आईने एएनआयशी बोलताना सांगितले.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Amritsar railway accident actor who played character of ravan in ramlila save atleast 8 lives
First published on: 21-10-2018 at 10:57 IST