अमृतसरच्या जोडा फाटकजवळ दसऱ्याच्या दिवशी झालेल्या भीषण अपघातात 61 जणांचा जीव गेला. ज्या डीएमयू ट्रेनमुळे हा अपघात झाला त्या ट्रेनच्या ड्रायव्हरने आपला लेखी जबाब दिला आहे. हा अपघात झाला त्यावेळी अरविंद कुमार हे ड्रायव्हर होते. अरविंद यांनी त्या दिवशी ट्रेनचा चार्ज घेण्यापासून अपघातानंतरचा घटनाक्रम आपल्या जबाबात मांडला आहे. अपघातानंतर गाडी थांबण्याच्या स्थितीत आली होती, मात्र अचानक लोकांनी दगडफेक सुरू केली त्यामुळे रेल्वेतील इतर प्रवाशांच्या सुरक्षाकारणास्तव ट्रेन थांबवली नाही असंही अरविंद यांनी आपल्या जबाबात म्हटलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अरविंद कुमार यांनी आपल्या जबाबात म्हटल्यानुसार, ‘मी 19 ऑक्टोबर रोजी संध्याकाळी 5 वाजता ट्रेन नंबर डीपीसी 11091 चा चार्ज घेतला आणि जालंधरच्या फलाट क्रमांक 1 वरून 5 वाजून 10 मिनिटांनी निघालो. संध्याकाळी 6 वाजून 44 मिनिटांनी मानांवाला येथे पोहोचलो, 6 वाजून 46 मिनिटांनी मला पिवळा सिग्नल आणि नंतर हिरवा सिग्नल मिळाल्यानंतर अमृतसरच्या दिशेने पुढे निघालो. मानांवाला आणि अमृतसरमध्ये गेट क्र. 28 आणि गेट सिग्नल ग्रीन पास करून ट्रेन पुढे निघाली. त्यानंतर गेट क्र.27 आणि दोन्ही गेट सिग्नल सातत्याने हॉर्न वाजवत पास केले. त्यानंतर जेव्हा ट्रेन केएम-नं. 508/11 जवळ पोहोचली त्यावेळी समोरच्या ट्रॅकवरुन ट्रेन क्रं. 13006 डीएन येत होती. अचानक लोकांची मोठी गर्दी ट्रॅकवर दिसली आणि तातडीने हॉर्न वाजवत इमर्जन्सी ब्रेक दाबले. इमर्जन्सी ब्रेक लावल्यानंतरही गाडीखाली अनेक लोकं चिरडली गेली होती. गाडीचा वेग कमी झाला होता आणि गाडी जवळपास थांबण्याच्या स्थितीत होती, पण तेवढ्यात लोकांनी गाडीवर दगडफेक सुरू केली. त्यामुळे गाडीत बसलेल्या इतर प्रवाशांच्या सुरक्षेचा विचार करुन मी गाडी पुढे नेली आणि अमृतसर स्थानकावर आलो. तोपर्यंत सर्व संबंधित अधिकाऱ्यांना मी घटनेची माहिती दिली होती’.

अमृतसरमध्ये रावण दहन सुरु असताना जमलेले अनेक लोक रेल्वे रुळांवरही उभे होते. या सगळ्यांना चिरडून एक ट्रेन अत्यंत वेगात गेली. या दुर्घटनेत आत्तापर्यंत ६१ जणांचा मृत्यू झाला. तर ५१ लोक जखमी झाले. या घटनेने अवघा देश सुन्न झाला. रावण दहनाचे दृश्य मोबाइलमध्ये कैद करण्यातही शेकडो लोक गुंग झाले असतानाच जालंधरहून अमृतसरकडे वेगाने निघालेली गाडी या मार्गावरून धडाडत आली. फटाक्यांच्या आवाजात आणि प्रकाशात गाडीचे प्रखर दिवे आणि भोंगे कुणाला ऐकूही गेले नाहीत आणि क्षणार्धात लोहमार्गावर उभ्या असलेल्या लोकांना धडक देत गाडी वेगाने पुढे गेली.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Amritsar train accident dmu train driver statement
First published on: 21-10-2018 at 18:16 IST