पंजाबातील अमृतसरजवळील जोडा रेल्वेफाटकाजवळ ‘रावण दहन’ पाहण्यासाठी जमलेली गर्दी रेल्वे रुळावरही उभी असतानाच या लोहमार्गावरून वेगाने आलेल्या गाडीची धडक बसून ६० जण मृत्यूमुखी पडले, तर ५१ जखमी झाले आहेत. या दुर्घटनेपेक्षाही धक्कादायक बाब म्हणजे, तिथे उपस्थित लोक मदत करण्याऐवजी कार्यक्रमाचे फोटो तसंच रेल्वे ट्रॅकवर उभं राहून सेल्फी काढण्यात व्यस्त होते. सोशल मीडियावर उपस्थित लोकांच्या या वागण्यावर संताप व्यक्त केला जात आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पंजाबचे मंत्री नवज्योत सिंग सिद्धू यांच्या पत्नी नवजोत कौर सिद्धू ज्या कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या होत्या त्यांनी सांगितलं आहे की, लोक जल्लोष करत असताना हा अपघात कसा झाला कोणालाच कळलं नाही. सर्व जल्लोष करत होते, रेल्वे रुळावंर उभे राहून सेल्फी काढत होते. इतक्या मोठ्या दुर्घटनेनंतर सेल्फी काढण्यात व्यस्त लोकांवर अनेक राजकीय नेत्यांनीही टीका करत दु:ख व्यक्त केलं आहे.

‘रेल्वे लोकांच्या अंगावरुन गेली असतानाही लोक मोबाइल काढून शुटिंग करत होते. ही अत्यंत बिनडोक आणि दुर्लक्षित दुर्घटना होती. व्हिडीओ पाहिल्यानंतर दुर्घटना किती भयानक होती याचा अंदाज येत आहे’, असं ट्विट जम्मू काश्मीरचे माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी केलं आहे.

आम आदमी पक्षाच्या प्रीती शर्मा यांनीही ट्रेन लोकांना चिरडून गेली असताना काहीजण शुटिंग करत होते यावर विश्वासच बसत नसल्याचं म्हटलं आहे.

प्रसारमाध्यमांमध्ये अपघातानंतरचे जे फुटेज दाखवण्यात आले त्यामध्ये अनेकजण मोबाइल फोन काढून ट्रॅकवरील भीषण अपघात आपल्या मोबाइलमध्ये कैद करत असल्याचं दिसत होतं.

दोन गाडय़ा आल्याने गोंधळ?
रावण दहन सुरू होताच रावणाच्या पुतळ्याच्या पोटातील फटाके जोरात वाजत उडू लागले. त्यामुळे या पुतळ्याजवळच्या लोकांनी लोहमार्गाकडे धाव घेतली. त्याचवेळी लोहमार्गावरही आधीच शेकडो लोक उभे होते आणि मोबाइलमध्ये चित्रीकरण करण्यात दंग होते. लोहमार्गावर गर्दी झाली असतानाच दोन्ही दिशांनी वेगाने रेल्वेगाडय़ा धडाडत आल्या. त्यामुळे लोक अधिकच भांबावले आणि लोहमार्गावरच खिळल्यागत राहिले आणि एका गाडीच्या धडकेने मृत्युमुखी पडले, असे समजते. मृतांच्या कुटुंबियांना पाच लाख रुपये दिले जातील आणि जखमींवर मोफत उपचार होतील, अशी घोषणा मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांनी केली. तर मृतांच्या कुटुंबियांना दोन लाख आणि जखमींना ५० हजार रुपयांची मदत पंतप्रधानांनी जाहीर केली आहे.

मोटरमन ताब्यात
दरम्यान अपघाता प्रकरणी पंजाब पोलिसांनी ट्रेनच्या मोटरमनला ताब्यात घेतले असून त्याची चौकशी सुरु आहे. मला ट्रेन पुढे नेण्यासाठी हिरवा कंदिल दाखवण्यात आला होता. सर्व मार्ग मोकळा आहे असे मला वाटले. रेल्वे रुळावर इतके लोक थांबले आहेत याची मला अजिबात कल्पना नव्हती असे या मोटरमनने सांगितले.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Amritsar train accident people were seen taking selfie and shooting celebration
First published on: 20-10-2018 at 12:43 IST