पंजाबमधील अमृतसरजवळील जोडा रेल्वेफाटकाजवळ शुक्रवारी रात्री रावण दहनाच्या कार्यक्रमा दरम्यान घडलेली भीषण दुर्घटना टाळता आली असती किंवा मृतांचा आकडा आणखी कमी होऊ शकला असता. रेल्वे रुळाजवळ होणाऱ्या रावण दहनाच्या कार्यक्रमाची कोणतीही माहिती किंवा सूचना देण्यात आली नव्हती असे अमृतसर रेल्वेमधील वरिष्ठ सूत्रांनी सांगितले.

काल जोडा रेल्वेफाटकाजवळ रावण दहन पाहण्यासाठी मोठी गर्दी जमली होती. रेल्वे रुळाला लागूनच असलेल्या मैदानात रावण दहनाचा कार्यक्रम सुरु होता. अनेक जण रेल्वे रुळावर उभे राहून रावण दहन पाहत असताना जालंधरहून अमृतसरच्या दिशेने भरधाव वेगात जाणाऱ्या रेल्वेने अनेकांना उडवलं. या दुर्घटनेत आतापर्यंत ६१ जणांचा मृत्यू झाला असून ७१ पेक्षा अधिकजण जखमी झाले आहेत.

रेल्वे राज्यमंत्री मनोज सिन्हा यांनी शुक्रवारी रात्रीच घटनास्थळी पोहोचून अधिकाऱ्यांकडून माहिती घेतली. उत्तर रेल्वेच्या फिरोझपूर विभागामध्ये हा भीषण अपघात घडला. स्थानिक रेल्वे प्रशासनाकडून कुठलाही सर्तकतेचा आदेश जारी करण्यात आला नव्हता. आगाऊ सूचना मिळाली असती तर ट्रेनचा वेग कमी ठेवता आला असता. दोन ट्रेन प्रचंड वेगात त्यावेळी ट्रॅकवरुन गेल्या.

विशेष म्हणजे मृत्यूमुखी पडलेले सर्वजण हे प्रवासी नव्हते, असे सांगत ‘घुसखोर’ म्हणून रेल्वेने त्यांची नोंद केली आहे. त्यामुळेच रेल्वेकडून या मृतांना कोणतीही भरपाई दिली जाणार नसल्याचे सांगण्यात आले. या अपघातानंतर तीन तासांहून अधिक काळ या मार्गावरील वाहतूक बंद करण्यात आली होती. रेल्वेमंत्री पियूष गोयल हे अमेरिका दौऱ्यावर असून दौरा थांबवून ते मायदेशी परतत आहेत. रेल्वेची पथकेही तातडीने रवाना झाली आहेत.

दरम्यान, काँग्रेसच्या मंत्री नवज्योत कौर या दहन कार्यक्रमाच्या मुख्य अतिथी होत्या. त्या दुर्घटनेनंतर निघून गेल्याचा आरोप भाजपने केला. तर मी दहन आटोपत असतानाच गाडीत बसून निघाले होते. त्यामुळे काय घडले, हे मला आधी माहीतच नव्हते, असे सांगत त्यांनी भाजपवर टीका केली. मृतांच्या नावावर कोणी राजकारण करू नये, असेही त्या म्हणाल्या.