बेपत्ता लष्कर जवान दहशतवादी संघटना हिजबूल मुजाहिद्दीनमध्ये सामील झाला असल्याची माहिती जम्मू काश्मीर पोलिसांनी दिली आहे. मिर इद्रिस सुल्तान असं या जवानाचं नाव असून महिन्याच्या सुरुवातीला दक्षिण काश्मीरमधून तो बेपत्ता झाला होता. त्याच्या बेपत्ता होण्याचं नेमकं कारण समजू शकलं नव्हतं. मात्र आता जम्मू काश्मीर पोलीस त्याने दहशतवादी संघटनेत प्रवेश केल्याचा दावा करत आहेत.

मिर इद्रिस सुल्तान हा लष्कराच्या जम्मू काश्मीर लाइट इंफंट्री युनिटमध्ये तैनात होता. रविवारीच त्याने दहशतवादी संघटनेत प्रवेश केला असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. अधिका-यांनी दिलेल्या माहितीनुसार, मिर इद्रिस सुल्तान शोपियनमधून बेपत्ता झाला होता. दहशतवादी संघटनेत प्रवेश करणार मिर इद्रिस सुल्तान एकटाच नसून त्याच्यासोबत अजून दोन स्थानिक लोक आहेत. हे दोघेही अशाच प्रकारे बेपत्ता झाले होते.

दरम्यान लष्कराने मात्र आमच्यासाठी अद्यापही मिर इद्रिस सुल्तान बेपत्ता असून, तो दहशतवादी संघटनेत सामील झाल्याची कोणतीच अधिकृत माहिती आमच्याकडे नसल्याचं सांगितलं आहे. पोलिसांनी केलेल्या दाव्यानुसार, मिर इद्रिस सुल्तानची पोस्टिंग झारखंडमध्ये होती आणि यामुळे तो नाराज होता.