अमेरिकेतील वॉशिंग्टन राज्यात हायस्पीड ट्रेन रुळावरुन घसरल्याची घटना घडली. या विचित्र अपघातात तीन प्रवाशांचा मृत्यू झाला असून १०० प्रवासी जखमी झाले आहेत. रुळावरुन घसरलेले डबे पुलावरुन खाली महामार्गावर पडले. हा रेल्वेमार्ग नुकताच सुरु झाला असून सोमवारी त्या मार्गावरुन पहिली प्रवासी ट्रेन धावत होती. त्याच ट्रेनला हा अपघात झाला आहे.

नव्याने सुरु झालेल्या आमट्रेक मार्गावर सोमवारी पहिली ट्रेन धावली. सिएटलवरुन पोर्टलंडच्या दिशेने ही ट्रेन जात होती. यादरम्यान वॉशिंग्टनमधील तकोमा येथे स्थानिक वेळेनुसार सकाळी साडे सातच्या सुमारास ट्रेन रुळावरुन घसरली. जिथे हा अपघात झाला तिथे वळण होते आणि तिथून काही अंतरावर पुल होते. या पुलाच्या खालून महामार्ग जातो. रेल्वेचा पहिला डबा रुळावरुन थेट महामार्गावर पडला. या दुर्घटनेत तीन जणांचा मृत्यू झाल्याचे स्थानिक प्रसारमाध्यमांनी म्हटले आहे. ट्रेनचा वेग मर्यादेपेक्षा जास्त असल्याने हा अपघात झाल्याचे वृत्त आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी या दुर्घटनेवर शोक व्यक्त केला. अमेरिकेतील पायाभूत सुविधांचे जाळे आणखी सक्षम करु असे त्यांनी म्हटले आहे. दुर्घटनेतील १०० पैकी ३ जखमींची प्रकृती गंभीर असून दुर्घटनेत महामार्गावरुन जाणाऱ्या गाड्यांचे नुकसान झाले आहे. दुर्घटनेच्या वेळी ट्रेनमध्ये सुमारे ८० प्रवासी होते.