देशविरोधी घोषणाबाजीच्या आरोपाखाली ७ काश्मीरी विद्यार्थ्यांवर लावण्यात आलेल्या देशद्रोहाचे आरोप मागे घेण्यात यावे, अन्यथा विद्यापीठ सोडून निघून जाऊ अशी धमकी येथे शिकणाऱ्या १२०० विद्यार्थ्यांनी दिली आहे. AMUचा माजी विद्यार्थी असलेला मन्नान वानी हा उच्चशिक्षित विद्यार्थी दहशतवादी बनला होता. काश्मीरमध्ये सुरक्षा रक्षकांनी नुकताच त्याचा एका कारवाईदरम्यान खात्मा केला. त्यानंतर AMUत शिकणाऱ्या काश्मीरी विद्यार्थ्यांनी वानीच्या मृत्यूसंदर्भात शोकसभेचे आयोजन केले होते. दरम्यान, यावेळी देशविरोधी घोषणाबाजी करण्यात आल्याचा आरोप आहे.

दरम्यान, येथील काश्मीरी विद्यार्थ्यांच्या या कृतीवर भाजपा खासदार सतीश गौतम यांनी प्रतिक्रिया दिली असून कोणत्याही दहशतवाद्याविरोधात नमाज पठण करणे कधीही सहन केले जाणार नाही, असे त्यांनी म्हटले आहे. त्याचबरोबर देशविरोधी घोषणाबाजीबाबत बोलताना गौतम म्हणाले, जे देशविरोधी घोषणाबाजी करतात अशा गद्दारांसाठी AMUत जागा नाही. अशा प्रकारचे विद्यार्थी जे विद्यापीठाचे वातावरण बिघडवत आहेत त्यांना विद्यापीठातून बाहेरचा रास्ता दाखवण्यात येईल.

दहशतवादी मन्नान वानीच्या खात्म्यानंतर काही काश्मीरी विद्यार्थ्यांनी AMUच्या केनेडी हॉलमध्ये वानीसाठी शोकसभेचे आयोजन केले होते. या सभेत देशविरोधी घोषणा दिल्याचेही बोलले जात आहे. याप्रकरणी दोन जणांना निलंबित करण्यात आले आहे. तर इतर ७ जणांविरोधात एफआयआर दाखल करण्यात आली असून यांपैकी ३ जणांविरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अलिगढ मुस्लिम विद्यापीठाने ९ विद्यार्थ्यांना नोटीस पाठवून त्यांच्याकडून उत्तर मागवले आहे. तर दुसरीकडे AMUचा माजी विद्यार्थी संघटनेचा नेता सज्जाद सुब्हान याने दोन विद्यर्थ्यांवरील खटले मागे घेण्यात यावेत अशी मागणी विद्यापीठ प्रशासनाकडे केली आहे. या मागणीवर विचार न झाल्यास विद्यापीठातील १२०० काश्मीरी विद्यार्थी विद्यापीठातील आपले शिक्षण अर्धवट सोडून जातील अशी धमकीही त्यांनी दिली आहे.


दरम्यान, १२०० काश्मिरी विद्यार्थ्यांनी AMU सोडून जाण्याचा पवित्रा घेणे ही गंभीर बाब असून AMUचे कुलगुरु, शिक्षण, गृहमंत्री राजनाथ सिंह आणि परराष्ट्र मंत्रालयातील अधिकाऱ्यांनी हा मुद्दा सोडवायला हवा, अशी मागणी एमआयएमचे नेते असदुद्दीन ओवेसी यांनी केली आहे.