अलीगड मुस्लीम विद्यापीठातील विद्यार्थ्यांनी काढलेल्या ‘तिरंगा यात्रे’वरून वाद सुरू झाला आहे. तिरंगा यात्रा काढणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रशासनाने कारणे दाखवा नोटीस बजावल्याचे वृत्त आहे. माध्यमांमध्ये व्हायरल झालेल्या या नोटिशीत म्हटले आहे की, विद्यार्थ्यांना यात्रेसाठी प्रशासनाची परवानगी घेतलेली नाही. रॅली विद्यापीठातील शिक्षण आणि शैक्षणिक वातावरणात अडचणी निर्माण करतात. विद्यापीठ प्रशासनाने २४ तासांच्या आत यावर स्पष्टीकरण मागितले आहे. उत्तर न दिल्यास विद्यार्थ्यांवर कारवाई केली जाईल, असा इशाराही दिला आहे.

आम्ही रॅलीसाठी अर्ज केला होता. प्रशासनाने अर्ज स्वीकारलाही नाही आणि रद्दही केले नाही, असे आयोजकांपैकी एक अजयसिंह यांनी सांगितले. आमचा अर्ज रद्द करण्याचा प्रकार पहिल्यांदाच झालेला नाही. यापूर्वीही आम्ही माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या निधनानंतर मेणबत्ती मोर्चा काढण्याची परवानगी मागितली होती. त्यावेळीही प्रशासनाने आम्हाला परवानगी नाकारली होती, असेही अजयसिंह यांनी सांगितले.

आरोप फेटाळताना सिंह म्हणाले की, शांततेत बैठकीचे आयोजन करणे हा आमचा घटनात्मक अधिकार आहे. हे प्रकरण आम्ही मनुष्यबळ विकास मंत्रालयासमोर उपस्थित करणार आहोत. या रॅलीत बाहेरील कोणीही सहभागी झाले नव्हते. उलट विद्यापीठ प्रशासनाने मन्नान वानीसाठी प्रार्थना सभेचे आयोजन करणाऱ्या काश्मिरी विद्यार्थ्यांना रोखले नाही, असा दावाही सिंह यांनी केला.

यापूर्वीही एएमयू विद्यापीठात अनेकवेळा वाद झाले आहेत. मागील वर्षी पाकिस्तानचे संस्थापक मोहम्मद अली जिना यांचे छायाचित्र लावण्यावरून वाद निर्माण झाला होता.