अलिगड मुस्लिम विद्यापीठाने इफ्तार पार्टीत दारु प्यायल्यामुळे एका विद्यार्थिनीला कारणे दाखवा नोटीस पाठवली आहे. विद्यार्थिनीचा व्हिडीओ फेसबुकवर व्हायरल झाल्यानंतर विद्यापीठाने ही नोटीस पाठवली आहे. ही घटना दहा दिवसांपुर्वीची आहे. विद्यार्थिनी दिल्लीमध्ये आपल्या मित्रांना भेटण्यासाठी गेली होती. यावेळी अलिगड मुस्लिम विद्यापीठाचे दोन माजी विद्यार्थीही उपस्थित होते.

‘हे अत्यंत संवेदनशील प्रकरण असून धार्मिक भावना दुखावल्या गेल्या आहेत. प्रशासनाकडून विद्यार्थिनीला कारणे दाखवा नोटीस पाठवण्यात आली आहे. जर विद्यार्थिनीकडून योग्य ते उत्तर आलं नाही तर शिस्तपालन समिती तिच्याविरोधात योग्य ती कारवाई करेल’, अशी माहिती विद्यापीठाचे जनसंपर्क अधिकारी प्रमुख एम शफे किडवाई यांनी दिली आहे.

विद्यार्थिनीला उत्तर देण्यासाठी एका आठवड्याचा वेळ देण्यात आला आहे. किडवाई यांनी सांगितल्यानुसार, व्हिडीओत विद्यार्थिनी जाणुनबुजून दारु पित असून तिचे मित्रही धर्माचा अनादर करत आहेत. इतर विद्यार्थ्यांची ओळख अद्याप पटलेली नाही.