लोकसभेत शुक्रवारी अविश्वास प्रस्तावावर चर्चा सुरु असताना एक ऐतिहासिक क्षण पाहण्याची सर्वांना संधी मिळाली जेव्हा काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची गळाभेट घेतली. राहुल गांधी पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपा आणि आरएसएसवर टीका करत त्यांना लक्ष्य करत होते. आपलं भाषण संपताच राहुल गांधी थेट पंतप्रधान नरेद्र मोदींच्या दिशेने चालत गेले आणि त्यांची गळाभेट घेतली. यानंतर आपल्या जागी येत हिंदू असण्याचा हा खरा अर्थ आहे असं म्हटलं. आपल्या जागी बसल्यानंतर राहुल गांधी डोळा मारतानाही दिसले, ज्यावरुन अध्यक्ष सुमित्रा महाजन त्यांना हे वागणं योग्य नसल्याचं सुनावलं.

मात्र राहुल गांधींची ही गळाभेट चांगलीच गाजली. गळाभेटीनंतर लगेचच सोशल मीडियावर प्रतिक्रिया उमटू लागल्या. प्रत्येकजण आपापल्या पद्धतीने गळाभेटीचं विश्लेषण करु लागलं होतं. मात्र या सर्वांमध्ये लक्ष वेधून घेतलं ते अमूलच्या कार्टूनने. आपल्या हटके कार्टून्ससाठी प्रसिद्ध असणाऱ्या अमूनले या गळाभेटीवरील कार्टून प्रसिद्ध केलं असून लोकांना ते प्रचंड आवडत आहे.

या कार्टूनमध्ये राहुल गांधी नरेंद्र मोदींची गळाभेट घेत डोळा मारत असताना दिसत आहेत. सोबतच लिहिलं आहे की, “Embracing (गळाभेट) की Embarrassing (संकोच)”.