एएन-३२ या मालवाहतूक विमानाला अरुणाचल प्रदेशच्या डोंगराळ भागात अपघात झाल्यानंतर या विमानाचा वापर बंद करण्याची मागणी होत आहे. पण भारतीय हवाई दल एएन-३२ या मालवाहतूक विमानाचा वापर बंद करणार नाही असे हवाई दल प्रमुख बीरेंद्र सिंग धनोआ यांनी सोमवारी स्पष्ट केले.

आमच्याकडे दुसरी पर्यायी विमाने नसल्यामुळे डोंगराळ भागात एएन-३२ या विमानांची उड्डाणे सुरुच राहतील असे धनोआ यांनी ग्वालहेर येथील पत्रकार परिषदेत सांगितले. नवीन अत्याधुनिक विमानांसह उपकरणे खरेदी करण्याच्या प्रक्रियेला हवाई दलाने गती दिली आहे. नवीन विमाने मिळाल्यानंतर महत्वाच्या कामांसाठी त्यांचा वापर केला जाईल. त्यानंतर एएन-३२ चा वापर फक्त प्रशिक्षणासाठी केला जाईल असे धनोआ यांनी सांगितले.

या महिन्याच्या सुरुवातीला अरुणाचल प्रदेशच्या दुर्गम भागात एएन-३२ विमान दुर्घटनाग्रस्त झाले. ज्यामध्ये सैन्य दलांशी संबंधित १३ जणांचा मृत्यू झाला. विमान रडारवरुन बेपत्ता झाल्यानंतर १७ दिवसांनी मृतदेह सापडले. अपघातामध्ये ब्लॅक बॉक्सचे नुकसान झाल्यामुळे अपघाताचे नेमके कारण एक रहस्य बनून रहाणार आहे. रशियन बनावटीच्या या जुन्या विमानाच्या वापरावर अनेकांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.

कारगिल युद्धाला २० वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमाला धनोआ मुख्य अतिथी म्हणून उपस्थित होते. महत्वाच्या टायगर हिलवर स्ट्राइक करण्याआधी मिराज २००० विमानांसाठी टार्गेट पॉड आणि लेझर गाईडेड बॉम्बच्या एकीकरणाचे काम कशा पद्धतीने करण्यात आले त्याची आठवण त्यांनी सांगितली.