एअर इंडियाच्या एका वैमानिकाची उड्डयन सुरक्षा विभागाने कसून चौकशी सुरू केली आहे. प्रवासादरम्यान कुवैत-गोवा हे विमान या वैमानिकाने अचानक 10 हजार फूट खाली आणलं होतं. याच महिन्यात 15 सप्टेंबरला ही घटना घडली होती.

एअर इंडियाचं ए-320 हे विमान कुवैतवरुन गोव्याला जात होते. मात्र, अचानक वैमानिकाने 35 हजार फुटांवरून हे विमान 25 हजार फुटांवर आणलं. पायलटने ‘हॉट ब्रेक’च्या इशाऱ्यानंतर तापमान कमी व्हावं यासाठी विमान खाली आणलं होतं अशी माहिती आहे. 35 हजार फुटांवर तापमान फार कमी असते, त्यामुळे ‘हॉट ब्रेक’ चा इशारा चुकीचा असावा असा अंदाज व्यक्त होत आहे. त्यानंतर थोड्याच वेळात विमान पुन्हा 35 हजार फूट उंचीवर नेण्यात आले.

सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, नेमकं काय घडलं होतं हे जाणून घेण्यासाठी उड्डयन सुरक्षा विभागाने वैमानिकाला एक ऑक्टोबर रोजी चौकशीसाठी बोलावलं आहे. वैमानिकाने स्वतःच याबाबतची माहिती एअर इंडियाला दिली होती. चौकशी पूर्ण होईपर्यंत यावर प्रतिक्रिया देण्यास एअर इंडियाच्या प्रवक्त्याने नकार दिला आहे.