लाहोरमधील एका दहशतवादविरोधी न्यायालया (एटीसी) ने जमात- उद- दावाचा म्होरक्या हाफिज सईदसह तीन जणांना अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे. पाकिस्तानमधील डॉन या वृत्तसंस्थेने ही माहिती दिली आहे. एका मदरशाच्या जमिनीचा बेकायदा कामांसाठी वापर केल्याप्रकरणी झालेल्या सुनावणीत न्यायालयाने हा निर्णय दिला असल्याचे सांगण्यात आले आहे. न्यायालयाने हाफिज सईदसह हाफिज मसूद, आमेर हमजा आणि मलिक जफर यांना ३१ ऑगस्टपर्यंत ५० हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर केला आहे.

काही दिवस अगोदरच पंजाब पोलिसांच्या दहशतवाद विरोधी विभागाकडून टेरर फंडिंग प्रकरणी हाफिजसह जमातच्या १३ नेत्यांविरोधात २३ एफआयआर दाखल केले होते. शिवाय हाफिज सईद विरोधात ठोस पुरावे देखील असल्याचे सांगण्यात आले होते. काही दिवसांपूर्वीच न्यायालयाने जमात आणि जैश-ए-मोहम्मदच्या १२ कार्यकर्त्यांना पाच वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावली होती.

असे सांगितले जात आहे की, या आरोपींनी पैसा गोळा करण्यासाठी पाच ट्रस्ट देखील तयार केल्या होत्या. ज्याद्वारे लश्कर-ए-तोयबा, जमात-उद-दावा आणि फलाह-ए-इंसानियत या संघटनांना मदत केली जात होती.