चीनमधील शांडोंग प्रांतात बैरूतप्रमाणेच मोठा स्फोट झाल्याची माहिती समोरा आली आहे. चिनी माध्यमांनी दिलेल्या माहितीप्रमाणे चीनमधील शांडोंग प्रांतातील एका बाजारानजीक हा स्फोट झाला. या स्फोटात किती जीवितहानी किंवा वित्तहानी झाली याची माहिती अद्याप मिळालेली नाही. परंतु हा स्फोट इतका मोठा होता की मोठ्या प्रमाणात धुराचे लोट पाहायला मिळाले. तसंच या स्फोटामुळे अनेक घरांची छतं उडाली आणि काचाही फुटल्या होत्या.

ग्लोबल टाईम्सनं दिलेल्या माहितीनुसार आतापर्यंत या स्फोटात कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नसल्याचं सांगण्यात आलं आहे. तसंच या घटनेची माहिती मिळाल्यानंतर त्वरित बचावकार्याला सुरूवात करण्यात आली आहे. या स्फोटात जखमी झालेल्यांनाही त्वरित रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. प्राथमिक तपासात शेतकरी ज्या ठिकाणी आपलं सामान ठेवतात त्या ठिकाणी हा स्फोट झाल्याचं सांगण्यात येत आहे. लाकडं कापताना वीजेच्या तारांचं नुकसान झालं आणि या ठिकाणी आग लागली आणि स्फोट झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

काही दिवसांपूर्वी लेबनॉनची राजधानी बैरूत येथेही मोठा स्फोट झाला होता. यामध्ये १७८ जणांचा मृत्यू झाला होता. बैरूतमधील बंदरावर देल्या सहा वर्षांपासून २ हजार ७५० टन अमोनियम नायट्रेट ठेवण्यात आलं होतं. त्याच्या भीषण स्फोट झाला होता. तो स्फोट इतका भीषण होता की तब्बल दीड किलोमीटरपर्यंत धुराचे लोट पाहायला मिळाले होते.