जम्मू काश्मीरमधील पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या १२ दिवसांनी भारतीय हवाई दलाने पाकिस्तानव्याप्त काश्मीरमधील दहशतवादी ठिकाणांवर मोठी कारवाई केली आहे. भारतीय हवाई दलाने दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करत चोख उत्तर दिलं आहे. भारतीय वायूसेनेच्या मिराज २००० या लढाऊ विमानांनी पहाटे साडेतीनच्या सुमारास पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसून जैश ए मोहम्मद या दहशतवादी संघटनेच्या तळावर १००० किलोग्रॅम वजनाचे बॉम्ब फेकले. १२ मिराज विमानांनी पाक हद्दीत घुसून दहशतवादी तळावर हल्ले केले. या हल्ल्यात जैश ए मोहम्मदची अल्फा ३ कंट्रोल रूम पूर्णपणे उद्धवस्त झली. या हल्ल्यात जवळपास ३०० दहशतवादी ठार करण्यात आले आहेत. ठार करण्यात आलेल्यांमध्ये जैश-ए-मोहम्मदचा म्होरक्या मसूद अझहरचा मेहुणा युसूफ अझहरचाही समावेश आहे.

पाकिस्तानने हल्ला झाल्याचं मान्य केलं आहे मात्र आमचं कोणतंही नुकसान झालं नाही असा दावा केला. भारतीय विमानांनी निर्जनस्थळी बॉम्ब टाकून पळ काढला असा दावा पाकिस्तानने केला होता. मात्र प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, पाकिस्तान खोटी माहिती देत असल्याचं उघड झालं आहे. प्रत्यक्षदर्शीने दिलेल्या माहितीनुसार, सकाळी ३.३० वाजता जणू काही ज्वालामुखी फुटला होता. जोरदार स्फोट झाले ज्यामध्ये अनेकजण जखमी झाले.

पाकिस्तानी नागरिक मोहम्मद आदिल यांनी बीबीसीला दिलेल्या माहितीनुसार, ‘रात्री अचानक जोरदार स्फोट झाल्याचा आवाज झाला. असं वाटलं ज्वालामुखीच फुटला आहे. यानंतर काही वेळासाठी विमानांचा आवाज आला जो नंतर शांत झाला. आम्ही सकाळी जाऊन पाहिलं तर खूप मोठा खड्डा पहायला मिळाला. तिथे अनेक लोक जखमी झाले होते. त्यामधील एकाला मी ओळखत होतो’.

पाकिस्तानी नागरिक मुख्तार हुसैन यांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘रात्री जवळपास तीन वाजण्याच्या सुमारास मोठा स्फोट झाला. यानंतर काही सेकंदांनी दुसरा स्फोट झाला. नंतर तिसरा, मग चौथा. स्फोटांच्या आवाजामुळे गावातील लोक घाबरले आणि घराबाहेर येऊन थांबले. आम्हाला काहीच दिसत नव्हतं. काही वेळाने आकाशात पाकिस्तानी विमानं घिरट्या मारत असल्याचं दिसलं पण भारतीय विमानं दिसत नव्हती’.