News Flash

‘चार दिवस झालेत झोप येत नाही’, इस्रायलमधील भारतीय परिचारिकेनं सांगितली आपबीती

केरळमधील बऱ्याच परिचारिका इस्रायलमध्ये गाझा जवळील भागात कार्यरत आहेत

इस्रायल आणि पॅलेस्टाईनमधील संघर्ष अधिक गंभीर होत आहे. पॅलेस्टाईनमध्ये लपलेली अतिरेकी संघटना हमास इस्रायलवर सातत्याने हल्ले करीत आहे, तर इस्रायल देखील गाझा पट्टीवर बॉम्बफेक करीत आहे. गेल्या काही दिवसांत, या संघर्षांमुळे, पॅलेस्टाईनमध्ये सुमारे दीडशे जणांनी आपला जीव गमावला, तर इस्रायलमध्ये १२ लोकांनी आपले प्राण गमावले. दरम्यान, या संघर्षामुळे इस्रायलमध्ये राहणाऱ्या भारतीय समुदायाच्या समस्या वाढल्या आहेत. वेळोवेळी सर्वत्र बॉम्बस्फोट आणि भीतीच्या वातावरणामुळे त्यांच्या उपजिविकेचा प्रश्न निर्माण झाला आहे. यामळे त्यांच्या जीवनास देखील धोका आहे.

इस्रायल-पॅलेस्टाईन संघर्षाच्या दरम्यान मंगळवारी हमासचे रॉकेट हल्यात एका भारतीय परिचारिकेचा मृत्यू झाला होता. या घटनेपासून इस्रायलमध्ये राहणाऱ्या अनेक भारतीय परिचारिका व्यावसायिकांमध्ये भीती पसरली आहे. इस्त्रायलने गाझा सीमेवर सैन्य पाठवले आहे. त्यामुळे तेथील रहिवाश्यांसमोर मोठं संकट निर्माण झालं आहे.

गाझा पट्टीपासून 38 कि.मी. अंतरावर असलेल्या इस्रायलमधील अश्दोद शहरातील भारतीय परिचारिका मारिया जोसेफ (33) यांनी ‘इंडियन एक्सप्रेस’ला सांगितले की, दोन देशांमधील समान संघर्षामुळे त्यांना चार दिवस झाले झोप येत नाही. “एक दिवस आधी आमच्या भागात रॉकेट पडत होते. इमारती हालत होत्या. आम्ही आमच्या मेसेज ग्रुपमध्ये सर्व सुरक्षित आहोत की, नाही हे विचारत होतो. मारियाच्या मते, केरळमधील अनेक परिचारिका गाझा जवळच्या भागात कार्यरत आहेत.

मारिया गेली अडीच वर्षे अश्दोदमध्ये असून ती इथल्या ८८ वर्षांच्या महिलेची काळजी घेत आहे. ते म्हणतात की, ज्या घरात ते राहत आहेत तेथे बॉम्ब निवारादेखील नाही. ही जुनी इमारत आहे, अशा परिस्थितीत त्या रुग्णाला सोडून कुठेही जाऊ शकत नाही.

२०१९ पर्यंत इस्रायलमध्ये भारतीय दूतावासाच्या आकडेवारीनुसार, देशात १४ हजार भारतीय आहेत. त्यापैकी १३ हजाराहून अधिक केअर टेकर म्हणून काम करत आहेत. वास्तविक, केअर टेकर कामासाठी इस्रायलमध्ये कायमचे वास्तव्य करण्यासाठी परदेशातून येण्याची प्रक्रिया सुलभ आहे. केरळ सरकारच्या अनिवासी केरलाइट अफेयर्स विभागाच्या रिक्रूटमेंट मॅनेजर अजित कोलासेरी यांच्या म्हणण्यानुसार, केरळमध्ये इस्रायल व्हिसाची मोठी मागणी आहे. इस्रायल हा एक ईसीएनआर देश आहे, म्हणजे दहावीनंतर शिकलेल्या लोकांना इमिग्रेशन तपासण्याची गरज नाही, म्हणून कोणीही तेथे काम करू शकते.

भारतात आणला जात आहे इस्रायलमध्ये मारल्या गेलेल्या परिचारिकेचा मृतदेह 

इस्रायलमध्ये ११ मे रोजी रॉकेट हल्ल्यात भारतीय महिला सौम्या संतोष मारल्या गेल्या होत्या. सौम्या संतोष याचा मृतदेह शुक्रवारी संध्याकाळी भारतात पाठविला गेला. हे विमान बेन गुरियन विमानतळावरून ३० वर्षाच्या सौम्यांचा मृतदेह घेऊन रवाना झाले. तत्पूर्वी, परराष्ट्र राज्यमंत्री व्ही मुरलीधरन यांनी ट्वीट करून माहिती दिली आहे की, “गाझा येथे झालेल्या रॉकेट हल्यात ठार झालेल्या सौम्या संतोष यांचा मृतदेह इस्रायलहून केरळ येथे नवी दिल्लीमार्गे आणला जात आहे. उद्या सौम्या यांचा मृतदेह त्यांच्या वडिलोपार्जित ठिकाणी आणला जाईल. मी वैयक्तिकरित्या नवी दिल्लीत हजर राहिल. त्यांच्या आत्म्याला शांती मिळो”

केरळमधील इडुक्की जिल्ह्यातील रहिवासी असलेला ३० वर्षीय सौम्या देखील इस्रायलमध्ये एका वृद्ध महिलेची काळजी घेत होत्या. अश्कलोन शहरात राहणारी सौम्या मंगळवारी पती संतोषशी व्हिडिओ कॉलद्वारे बोलत होती, जेव्हा तिच्या घरावर रॉकेट पडले. यामध्ये त्यांचा मृत्यू झाला. सौम्या यांना नऊ वर्षाचा मुलगा देखील आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 15, 2021 11:50 am

Web Title: an indian nurse in israel described the situation there srk 94
Next Stories
1 दिलासा! पुढील आठवड्यात ‘DRDO’चे अँटी-कोविड औषध ‘2-DG’ होणार लाँच
2 करोना मृत्यूचं वादळ कायम; २४ तासांत चार हजार रुग्णांनी गमावले प्राण
3 आंध्र प्रदेशः सत्ताधारी वायएसआर कॉंग्रेसच्या खासदाराला अटक, देशद्रोहाचा गुन्हा दाखल
Just Now!
X