पोलीस कधीच मदत करत नाहीत, फक्त लाच घेण्याचं काम करतात असे अनेक आरोप नेहमी केले जातात. मात्र नवी दिल्लीत एका पोलीस अधिकाऱ्याने रस्त्यावर जखमी अवस्थेत रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या महिलेची मदत करत तिचा जीव वाचवल्याची घटना समोर आली आहे. महिलेला चाकूने भोसकण्यात आलं होतं. पण पोलीस अधिकाऱ्याने वेळीच मदत केल्याने महिलेचा जीव वाचला आहे.

39 वर्षीय तनुजा विधवा असून शिक्षिका आहेत. गिरीनगर येथे त्यांच्यावर शेखर नावाच्या व्यक्तीने चाकू हल्ला केला होता. शेखर याची दोन्ही मुलं तनुजा यांच्याकडे शिकत आहेत. पोलीस निरीक्षक सिद्दालिंगिया जवळच्या पोलिंग बूथवर तैनात होते. यावेळी एका व्यक्तीने सिद्दालिंगिया यांना महिलेवर हल्ला झाला असल्याची माहिती दिली.

‘मी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली तर तिथे लोकांची गर्दी जमलेली होती. महिला जखमी अवस्थेत रक्ताच्या थारोळ्यात पडली होती’, असं सिद्दालिंगिया यांनी सांगितलं आहे. सिद्दालिंगिया यांनी रक्तस्त्राव थांबवण्यासाठी महिलेच्या कमरेला कापडाने घट्ट बांधलं आणि उचलून घेत रुग्णालयाच्या दिशेने धाव घेतली.

महिला गंभीर जखमी झाली होती. व्हिक्टोरिया रुग्णालयात आधीच सूचना देण्यात आली असल्याने डॉक्टरांनी उपचाराची सर्व तयारी करुन ठेवली होती. रुग्णवाहिकेतून महिलेला रुग्णालयात पोहोचवण्यात आलं. रुग्णालयात पोहोचले असता तनुजा यांनी AB+ रक्ताची गरज होती. पण रुग्णालयात रक्त उपलब्ध नसल्याने अजून एक अडचण निर्माण झाली होती. पण सुदैवाने सिद्दालिंगिया यांचा रक्तगट सारखाच होता. सिद्दालिंगिया यांनी रक्त दिल्याने तनुजा यांचा जीव वाचला. पोलिसांनी हल्लेखोर आरोपीलाही अटक केली आहे.