बिहार विधानसभा निवडणुकांच्या निकालांचा रोख स्पष्ट झाला असून, भारतीय जनता पक्ष यात जिंकणार नाही, हे स्पष्ट झाले आहे. भाजप जिंकला नाही तर पाकिस्तानात फटाके वाजतील असे पक्षाध्यक्ष अमित शहांनी सांगितले होते. अजून तरी पाकिस्तानात बॉम्ब सोडा, साध्या फुलबाज्याही उडाल्याचे ऐकू आलेले नाही. इतकेच काय, पण कमळ उमलण्याची आस बांधून असलेल्या मंडळींच्या तंबूंमध्ये आणून ठेवलेले फटाकेही जागच्या जागी सर्दून जाण्याची खात्री झाली आहे.
हे होण्याची फारशी अपेक्षा नव्हती, तरी असे होऊ शकते ही चिंता बहुतेकांना होती. अगदी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्वयंसेवकांना आणि हितचिंतकांनाही होती. कारण स्पष्ट होते. जे पाप उत्तर प्रदेश-बिहारमधील काँग्रेसच्या मंडळींनी अनेक दशके केले, तेच पाप भाजपची मंडळी गेल्या वर्ष-दीड वर्षांत करताना दिसून येत होते. नेहरू-गांधी नाव घेतले, की वाटेल त्या परिस्थितीत निवडून येऊ, हा विश्वास मनात ठेवूनच काँग्रेसच्या लोकांनी स्वतः काम करणे सोडून दिले आणि पक्षाची संघटना खुंटीवर टांगून व्यक्तीच्या मागी लागले. आज परिणाम असा झाला, की नितीशकुमार आणि लालूप्रसाद यादव यांच्या खाद्यांवर बसून काँग्रेसला विधानसभेत प्रवेश करावा लागतोय. अन् तरीही आमच्या १० जागा वाढतायत ते राहुल गांधींच्या नेतृत्वामुळेच हा त्यांचा पीळ कायम आहेच!
त्याचाच थोडा फार कित्ता भाजपची मंडळी गिरवू लागली. नरेंद्र मोदी हे नाव लिहिलेला दगड हाताशी असला, तर बहुमताचा सेतू बांधून निवडणुकीचा समुद्र तरून जाऊ, ही श्रद्धा भाजपच्या मंडळींनी बाळगली. त्याचा व्हायचा तोच परिणाम झाला. याच श्रद्धेतून या लोकांनी चरकात ऊस पिळावा, तसे मोदींच्या वक्तृत्वशैलीची पिळवणूक चालवली होती. आणि मग मोदींचे नाव घेतले की सर्व पापे धुतली जातात, हा विश्वास बळावल्यावर कार्यकर्त्यांची पत्रास न बाळगणे, वाह्यात विधाने करण्याची चढाओढ करणे, समोरच्याला धुडकावून लावणे अशा वावदुकी चेष्टांना सुरूवात झाली.
एखादा पंखा वीज चालू असताना फिरतो आणि वीज खंडीत केल्यावरही काही वेळ फिरत राहतो. लोकसभा निवडणुकीच्या वेळेस असलेला असंतोष, लोकांचा विश्वास, भविष्याबद्दलचा विश्वास इ. गोष्टी मोदींना ऊर्जा पुरवत होत्या. त्या आजही तशाच असतील, हा भाबडा विश्वास भाजपच्या अंगाशी येणारच होता आणि तो आलाही. ‘सुबे का चुनाव भाजपा ने देश का चुनाव बना दिया,’ हे शरद यादव यांचे विधान या पार्श्वभूमीवर महत्त्वाचे ठरावे.
अन् तरीही आता ज्या काही जागा भाजपला मिळाल्या आहेत, त्या मोदींनी घेतलेल्या सभेमुळेच, त्यांच्या करिष्म्यामुळेच हा एक विरोधाभासच म्हणावा लागेल. याचे कारण म्हणजे लोकांनी नरेंद्र मोदीमध्ये पंतप्रधान पाहिला आणि आजही ते त्या पदासाठी योग्य आहेत, असेच लोकांचे मत आहे. अमेरिकेच्या ‘पेव’ सारख्या संस्थांनी केलेल्या पाहणीमध्येही हे दिसून आले आहे. पण विधानसभेच्या निवडणुकीत त्यांचा प्रचार करणे हे लोकांना पटेलच असे नाही. अन् तेही नितीश कुमारसारख्या जनतेत अलोकप्रिय नसलेल्या नेत्याच्या विरोधात. म्हणूनच प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यांमध्ये मोदींचा उल्लेख ‘प्रचार मंत्री’ असा केला जाऊ लागला. त्यांनी इतका जोर लावला नसता, तर भाजपचे कमळ पुरते खुडून गेले असते.
सर्वोच्च नेत्यावर विसंबून न राहता कार्यकर्त्यांच्या बळावर विजय मिळवता कसा येतो, हे बिहार भाजपच्या (आणि महाराष्ट्रातीलही) मंडळींनी स्वपक्षाच्याच केरळमधील विजयातून शिकावे. गेली अनेक वर्षे चेष्टा-कुचेष्टेच्या बळी ठरलेल्या या पक्षाच्या लोकांनी केरळमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये चमकदार कामगिरी करून काँग्रेस आणि डाव्यांच्या दोन बलाढ्य आघाड्यांच्या डोळ्यापुढे तारे चमकाविले. तिरुवनंतरपुरम महापालिकेत हा पक्ष दुसऱ्या क्रमांकावर आला, चार वरून तेथील पक्षाच्या सदस्यांची संख्या ३४ वर आली, तेथील काँग्रेसचा महापौर भाजपच्या उमेदवाराकडून पराभूत झाला, १४ ग्रामपंचायत त्यांच्या ताब्यात आल्या, कोळ्ळम वगळता सर्व जिल्हा परिषदेत त्यांचे सदस्य निवडून आले आणि हे सर्व मोदींचे नाव न घेता! एकही बेफाम विधान खात्यावर न नोंदवता! कार्यकर्तेच जिथे लढाई लढतात तिथे नेत्याची फक्त प्रेरणा असावी लागते, त्याने स्वतः आले नाही तरी चालते.
आता इथून पुढे आपली बेअब्रू टाळायची असेल तर खुद्द मोदींनाच पावले टाकावी लागतील. त्यांच्याविरोधात असहिष्णुतेचा पुकारा होत असला, तरी खरोखर असहिष्णु त्यांना आता व्हावेच लागेल. साक्षी महाराज, गिरीराज सिंह अशा वात्रटांना त्यांची जागा दाखवून द्यावी लागणार आहे. केंद्रीय मंत्रिमंडळात कृषी मंत्री राधामोहन सिंह हे बिहारचे. पण ना त्यांचा देशाला उपयोग ना बिहारला आणि इकडे शेतकरी वाऱ्यावर. अशा बुजगावण्यांना बाजूला करावेच लागेल. आणि फॅसिझम आणि असहिष्णुतेचा शंखनाद करत जाणाऱ्यांचाही समाचार घ्यावाच लागेल. कोणी अपप्रचार करत असेल तर त्याला जोपर्यंत कामाने उत्तर देता येणार नाही तोपर्यंत शब्दांनी तरी द्यावेच लागेल. आणि ‘आपला’ नसलेला प्रत्येक जण पाकिस्तानच्या व्हिसासाठी रांग लावणारा नसतो, हे आपल्या नेत्यांना समजावे लागेल. ‘वाईट माणसांच्या संगतीने चांगल्या माणसालाही मानहानी पत्करावी लागते. लोखंडाच्या सान्निध्यात अग्नीलाही घणाचे घाव सोसावे लागतात,’ हे सुभाषित त्यांनी ऐकलेले असावे, ही अपेक्षा आहे.
यात नितीश कुमार यांचे कौतुक करावे तेवढे कमी आहे. गेल्या तीन निवडणुकांमध्ये त्यांनी बिहारमध्ये तीनदा युती केली आणि तिन्ही वेळेस आपल्या सोबतच्या लोकांना विजय मिळवून दिला. यातील दोन वेळेस भाजप हा त्या युतीतील लाभार्थी होता – आज ती जागा लालूंनी घेतली आहे. उत्तम राजकीय व्यवस्थापन कसे असावे, याचा हा मासला म्हणावा लागेल. शिवाय ज्याअर्थी अगदी नितीशकुमारांसोबतआहेत म्हटल्यावर लालूप्रसादांवरही विश्वास टाकायला लोक तयार होतात, त्याअर्थी त्यांनी किती विश्वास लोकांच्या मनात निर्माण केलाय, हे दिसून येते. प्रत्यक्ष जमिनीवर दिसून येणारे काम आणि त्याला सचोटीची जोड असल्याशिवाय हे होत नाही.
– देविदास देशपांडे
devidas@didichyaduniyet.com