महिंद्रा अॅण्ड महिंद्राचे अध्यक्ष आनंद महिंद्रा यांनी सध्या चर्चेत असलेल्या आनंद कुमार यांच्यासंदर्भात एक ट्विट केले आहे. हृतिक रोशनचा सुपर ३० हा सिनेमा ज्यांच्या आयुष्यावर आधारित आहे त्या आनंद कुमार यांनी आपण दिलेली देणगी नाकारली होती असं महिंद्रा यांनी सांगितले आहे.

एका मुलाखतीमध्ये आनंद कुमार यांनी आपण अनेक बड्या व्यक्तींने देऊ केलेली देणगी नाकारल्याचे म्हटले. यामध्ये कुमार यांनी आनंद महिंद्रांचेही नाव घेतले होते. याच बातमीवर महिंद्र यांनी ट्विटवरुन प्रतिक्रिया नोंदवली आहे. ‘मी देऊ केलेली मदत नाकारल्याने आनंद कुमार यांनी नुकतेच एका लेखामध्ये सांगितले. मी सांगू इच्छितो की आमची खरोखर भेट झाली आहे. या भेटीमध्ये मी त्यांना आर्थिक मदत करण्यासंदर्भात विचारले असता त्यांनी नम्रपणे मदत नाकारली. त्यांनी अनेकांचे आयुष्य बदलले आहे आणि त्यासाठीच मी त्यांचा प्रशंसक राहिलं,’ असं महिंद्रा यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे. या ट्विटमध्ये त्यांनी स्वत:चा आणि आनंद कुमार यांचा फोटोही पोस्ट केला आहे.

कुमार यांचे सुपर ३० योजनेचे काम आणि आवाका पाहून प्रभावित झालेल्या महिंद्रांनी त्यांना मदत देऊ केलेली. मात्र कुमार यांनी ती नाकारल्याची आठवण महिंद्रा यांना सुपर ३० सिनेमाच्या निमित्ताने झाली.

‘मी कोणाकडूनही कोणत्याही प्रकराचा मदतनिधी घेत नाही. आपले पंतप्रधान, करोडपती व्यवसायिक, मुकेश अंबानी तसेच आनंद महिंद्रांसारख्या बड्या उद्योजकांनाही मला आर्थिक मदत देण्यासंदर्भात चौकशी केली होती. मात्र मी कोणाकडूनही कोणत्याही प्रकारची आर्थिक मदत घेतली नाही. मी सर्वांना माझ्या कामाची माहिती देण्यासाठी भेटतो पण कोणाकडूनही मदत म्हणून पैसे घेत नाही. मला शैक्षणिक क्षेत्रात चांगले काम करायचे आहे एवढेच माझे ध्येय आहे,’ असं आनंद कुमार यांनी पीटीआयशी बोलताना सांगितले होते.

आनंद कुमार यांचे कार्य

गणितात कमालीचे प्रावीण्य मिळवलेल्या आनंद कुमार यांचे नाव आता जगभरात झाले आहे. त्यांनी हुशार असलेल्या परंतु गरिबीमुळे मागे पडणाऱ्या विद्यार्थ्यांना मोफत गणित शिकवण्याचा उपक्रम बिहारमध्ये ‘सुपर-३०’ नावाने सुरू केला. त्यांची संस्था या मुलांची चाचणी घेऊन तीस जणांची निवड करते व नंतर त्यांना आयआयटी व इतर अनेक परीक्षांसाठी गणिताचे प्रशिक्षण देते. डिस्कव्हरी चॅनेलने त्यांच्या या गणित वर्गावर एक तासाचा कार्यक्रम केला होता. जगप्रसिद्ध ‘टाइम’ मासिकाने त्यांना या कार्याची शाबासकी दिली आहे. त्यांचे गणितातील शोधनिबंध ‘मॅथेमॅटिकल स्पेक्ट्रम’ व ‘द मॅथेमॅटिकल गॅझेट’ या नामांकित नियतकालिकांत प्रसिद्ध झाले आहेत. त्यांना केंब्रिज विद्यापीठात शिक्षणासाठी प्रवेश मिळाला होता, आर्थिक स्थितीमुळे त्यांना प्रवेश घेता आला नाही.