प्रेरणादायी विचार मांडणारे, नवोदितांना प्रोत्साहन देणारे उद्योजक अशी आनंद महिंद्रांची ओळख आहे. वेळोवेळी सोशल मीडियाच्या माध्यमातून महिंद्रांची ही बाजू समोर येते आणि उद्योगजगताशी काहीही संबंध नसलेले सर्वसामान्यही आनंद महिंद्रांशी जोडले जातात. महिंद्रांच्या या गुणाचा पुन्हा एक अनुभव पृथ्वी शॉच्या शतकानंतर आला आहे.

पृथ्वी शॉ या मुंबईकरानं पदार्पणातच वेस्ट इंडिजविरूद्ध राजकोटमध्ये शतक झळकावलं आणि त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव सुरू झाला. आनंद महिंद्रांनीदेखील त्याचं कौतुक केलं, पण हटके अशा स्वत:च्या स्टाईलमध्ये… ट्विटमध्ये आनंद महिंद्रांनी म्हटलंय, “आयुष्य नेहमी समतोल साधतं. इंधनांच्या किंमती वाढताना, शेअर बाजार कोसळताना व रूपयाचं अवमूल्यन बघताना आम्हा उद्योजकांचा आत्मा बेचैन होतो. परंतु दुसरीकडे एक नवा तारा उदयाला येत असतो, जो आमच्या चेहऱ्यावर हसू फुलवतो.”

सध्या इंधनाचे भडकते भाव, चलनाची घसरण आणि शेअर बाजाराची पडझड या पार्श्वभूमीवर आर्थिक जगतात चिंतेचे ढग साचलेले असताना महिंद्रा यांनी पृथ्वी शॉच्या पदार्पणातील शतकाची अशी घातलेली सांगड नक्कीच त्यांची सकारात्मक वृत्ती दाखवणारी आहे.